प्रशासनकुशल नेतृत्वाचा गौरव : नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
शांत, संयमी, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणजे पाचगणी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे. बोलण्यात नम्रता, विचारांत प्रगल्भता आणि कृतीत ठामपणा असलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे खर्या अर्थाने “जीभेवर सरस्वती आणि मनात शहराची तळमळ” असलेले नेतृत्व होय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय प्रवासाकडे मागे वळून पाहताना पाचगणीच्या विकासाचा एक प्रेरणादायी इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो.

पाचगणी ही निसर्ग आणि शिक्षणाची पंढरी देश-विदेशात पोहोचावी, यासाठी ज्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यामध्ये दिलीपभाऊ बगाडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सुरुवातीपासूनच शांत स्वभाव, परिश्रमाची तयारी आणि “काहीतरी करून दाखवायचे” ही जिद्द हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव राहिला आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी पाचगणी नगरपालिकेत नोकरी स्वीकारली; मात्र केवळ नोकरी करून थांबले नाहीत, तर सेवेच्या माध्यमातून नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली.

नगरपालिकेतील प्रदीर्घ सेवाकाळात सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची शैली नेहमीच चर्चेचा विषय ठरली. प्रशासकीय सेवेत असतानाच त्यांनी स्वतःला समाजसेवेत झोकून दिले. व्यायाम मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कबड्डी व क्रीडाक्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान आजही पाचगणीकर अभिमानाने सांगतात. भि. दा. भिलारे गुरुजी, वैकुंठवासी कळंबे महाराज, बाळासाहेब भिलारे, भाऊसाहेब भिलारे, विष्णू कासुर्डे, दशरथ बगाडे अशा समाजसेवेच्या दिग्गजांच्या सान्निध्यात राहून त्यांनी समाजकारणाचा वसा जपला.
उपनगराध्यक्षपदाच्या काळात त्यांनी केलेले कार्य आजही स्मरणात आहे. स्वच्छ सर्वेक्षणात पाचगणी नगरपालिकेला देशपातळीवर गौरव मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पाचगणीचा झेंडा थेट दिल्लीपर्यंत फडकवणाऱ्या या यशामागे त्यांची टीमवर्कची वृत्ती आणि काटेकोर नियोजन होते. स्वच्छता, मुबलक पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकामाचे प्रश्न यावर त्यांनी पोटतिडकीने काम करून शहरात वेगळीच छाप निर्माण केली.
आज पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून ते पाचगणीकरांच्या सेवेस सज्ज झाले आहेत. आपल्या व्यवसायातून आणि सामाजिक संपर्कातून त्यांनी सर्व समाजघटकांशी आपुलकीचे नाते जोडले आहे. त्यामुळेच त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळतो आहे. पाचगणीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी संकल्प मांडले आहेत—गावठाण व हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढणे, जुन्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून मुबलक पाणी देणे, नवीन पर्यटनस्थळे विकसित करणे, बाजारपेठेतील वाहतूक कोंडी फोडणे, स्वच्छतेचा नावलौकिक टिकवणे, रस्ते सुधारणा, चटई क्षेत्र वाढ, पर्यटनस्थळांचे सुशोभीकरण, वस्ती सुधार योजना, भुयारी वायरिंग, एसटीपी प्लांटची उभारणी आणि रोपवेच्या माध्यमातून नवीन पर्यटन आकर्षण निर्माण करणे—असे अनेक विकासस्वप्न त्यांनी पाहिली आहेत.
“मला मत म्हणजे शहराच्या विकासाला मत” हा त्यांचा विचार केवळ घोषवाक्य नसून कृतीत उतरलेला संकल्प आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाचगणीकरांना एवढेच म्हणावेसे वाटते की, प्रशासनकुशल, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्वाच्या हातात शहराची सूत्रे सुरक्षित आहेत. दिलीपभाऊ बगाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या हातून पाचगणीच्या विकासाची घोडदौड अशीच अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा!

