पाचगणीत भेकराच्या पिल्लाची नागरी वस्तीत धाव; प्राचार्य कक्षात घेतला आश्रय कुत्र्यांच्या पाठलागाने घाबरलेले पिल्लू अखेर रेस्क्यू टीमकडून वनविभागाच्या ताब्यात

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरात सोमवारी दुपारी एक अनोखी आणि तितकीच हृदयस्पर्शी घटना घडली. जंगलातून भरकटून आलेले हरीण कुळातील ‘भेकर’ या वन्यप्राण्याचे पिल्लू नागरी वस्तीत शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कुत्र्यांनी पाठलाग केल्याने जीवाच्या भीतीने सैरभैर झालेल्या या भेकराच्या पिल्लाने अखेर श्रीमती मिनलबेन मेहता कॉलेजमध्ये धाव घेत थेट प्राचार्य कक्षात आश्रय घेतला. प्राचार्यांच्या टेबलाखाली लपून बसलेल्या या पिल्लाकडे पाहून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास जंगल परिसरातून भरकटून आलेले हे पिल्लू शहरातील नागरी भागात आले. त्याचवेळी काही भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. घाबरलेल्या अवस्थेत जीव वाचवण्यासाठी धावत सुटलेल्या या भेकराच्या पिल्लाने कॉलेज परिसर गाठला आणि थेट प्राचार्यांच्या केबिनमध्ये शिरून टेबलाखाली लपून बसले. त्यावेळी प्राचार्य स्वतः केबिनमध्ये उपस्थित होते.

घटनेची माहिती मिळताच कॉलेज प्रशासनाने तत्काळ संयम दाखवत पिल्लाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या अवस्थेतील या वन्यप्राण्याला पाणी पाजण्यात आले तसेच वनविभाग आणि पाचगणीतील ॲनिमल रेस्क्यू टीमला याबाबत माहिती देण्यात आली.

दरम्यान, माहिती मिळताच प्राणीमित्र राजू गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह रेस्क्यू टीमचे सदस्य निहाल बागवान आणि राजेश चौरसिया यांनी शिताफीने आणि काळजीपूर्वक या भेकराच्या पिल्लाला पकडले. कोणतीही इजा न होता त्याला सुरक्षितरित्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा जंगल परिसरात वाढता मानवी हस्तक्षेप, वनक्षेत्राचा होत असलेला ऱ्हास आणि उन्हाळ्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले आहे. अधिवास कमी होत असल्याने वन्यप्राणी अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!