लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती पाचगणीत उत्साहात साजरी
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरातील शाहूनगर येथील अहिल्याबाई होळकर चौकात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित धनगर समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देत समाजहितासाठी अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी समस्त धनगर समाज बांधव तसेच महिला भगिनींनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. समाजाच्या एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा जागर केला.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, नगरसेवक नारायण बिरामणे, महेश खांडके, माजी नगराध्यक्षा अनिता चोपडे, टेबललँड व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष नामदेव चोपडे, माजी उपनगराध्यक्षा रेखा चोपडे आदी मान्यवरांनी लोकमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात धनगर समाजातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यामध्ये जालिंदर चोपडे, बबन शिंदे, नंदकुमार जानकर, दत्ता जानकर, अशोक जानकर, संदीप जानकर, अविनाश चोपडे, दिलीप जानकर, सुमित जानकर, सुरज चोपडे, मंगेश यादव, शशिकला जानकर, राहुल सोडणवर, राहुल जानकर, बाहू चोपडे, उत्तम चोपडे, अरुण जानकर, दत्तात्रेय जानकर, स्मिता जानकर, मनीषा सोडणवर यांच्यासह समाजातील असंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या न्यायप्रिय, लोकाभिमुख आणि धर्मनिरपेक्ष शासनपद्धतीचा आदर्श समाजाने कायम स्मरणात ठेवावा, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत डॉ. शीतल चोपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. आशिष चोपडे यांनी मानले.

