पाचगणीत खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर व हळदीकुंकूचा उत्सव; सौ. रूपाली शिंदे ठरल्या पैठणीच्या मानकरी”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरातील महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेला खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर आणि हळदीकुंकू हा भव्य व देखणा कार्यक्रम नुकताच नचिकेताज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पाचगणी यांच्या प्रशस्त प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाचगणी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक नारायण बिरामणे व नगरसेविका सुप्रिया माने यांच्या संकल्पनेतून, तसेच एस्टोन हॉटेलचे संचालक अमर बिरामणे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. रंजना बिरामणे, सौ. सारिका बिरामणे व सौ. प्रज्ञा बिरामणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व होम मिनिस्टर खेळाची रंगतदार प्रश्नावली निवेदक प्रमोद पवार यांनी सादर केली. त्यांच्या मिश्कील शैलीतील प्रश्नोत्तरांनी उपस्थित महिलांमध्ये हास्य, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पाचगणी शहरासह आंबेडकर कॉलनी, शाहूनगर, सिद्धार्थनगर, गोडवली, आंब्राळ व राजपुरी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली.
खेळ पैठणीचा या प्रमुख आकर्षण असलेल्या स्पर्धेत सौंदर्य, आत्मविश्वास, उपस्थितीबुद्धी आणि प्रश्नोत्तरातील चतुराई यांच्या कसोटीवर सहभागी महिलांची परीक्षा घेण्यात आली. या चुरशीच्या स्पर्धेत सौ. रूपाली शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणीच्या मानकरी होण्याचा बहुमान मिळविला. द्वितीय क्रमांक सौ. स्नेहल पवार, तृतीय सौ. स्वाती बिरामणे, चौथे बक्षीस सौ. ऐश्वर्या जानकर तर पाचवे बक्षीस कुमारी तेजल पिंगळे यांनी पटकावले.
याशिवाय कार्यक्रमात लकी ड्रॉ कूपन काढण्यात आले. त्यामध्ये प्रथम बक्षीस सौ. स्नेहा भिलारे, द्वितीय बक्षीस सौ. अस्मिता भिलारे तर तृतीय बक्षीस सौ. पूनम बागडे यांना मिळाले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. रूपाली राजपुरे (माजी सभापती, महाबळेश्वर पंचायत समिती) उपस्थित होत्या. तसेच सीमा कासुर्डे, पाचगणी नगरपरिषदेच्या नगरसेविका राजश्री सणस, स्वाती कांबळे, माधुरी कासुर्डे, अमृता गोळे, विमल भिलारे, परवीन मेमन, शिल्पा माने, अभिलाषा कऱ्हाडकर, माजी नगराध्यक्ष अनिता चोपडे, रेखा चोपडे, स्मिता जानकर, सुमन गोळे (माजी नगरसेविका), सुनीता दुधाने (माजी सरपंच) आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. आपल्या मनोगतात पाहुण्यांनी महिलांसाठी अशा प्रकारचे सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजनात्मक उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळते, परस्पर स्नेह वाढतो आणि पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपला जातो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुबक व शिस्तबद्ध होते. उपस्थित महिलांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. एकंदर, खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर व हळदीकुंकू हा कार्यक्रम पाचगणी शहरातील सामाजिक-सांस्कृतिक जीवनात एक संस्मरणीय ठसा उमटवून गेला, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत आहे.

