पाचगणी बसस्थानकातील बेकायदेशीर पार्किंगवर सातारा विभागीय कार्यालय व पाचगणी पोलीस याची संयुक्त धडक कारवाई; बेकायदेशीर वाहनधारकांचे धाबे दणाणले..
- पाचगणी बसस्थानक परिसरातील बेकायदेशीर पार्किंगवर संयुक्त कारवाई करताना एसटी प्रशासन व पाचगणी पोलिस स्टेशनचे अधिकारी.
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी बसस्थानक परिसरात २०० मीटरच्या हद्दीत बेकायदेशीररित्या पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांवर सातारा विभागीय एसटी कार्यालय आणि पाचगणी पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत दंडात्मक कारवाई केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, प्रवाशांची गैरसोय टाळणे तसेच अनधिकृत पार्किंगला आळा घालण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. संयुक्त पथकाने बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातील बेकायदेशीररीत्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी करून संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.
ही कारवाई सातारा विभागीय कार्यालयाच्या गायकवाड मॅडम, सुरक्षा निरीक्षक तथा दक्ष अधिकारी आणि पाचगणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी एसटीचे सुरक्षा निरीक्षक तथा दक्ष अधिकारी उल्हास कदम, श्रीमती आटपडकर, वाहतूक निरीक्षक वाघेला, एस. व्ही. तरडे, वाहतूक नियंत्रक जितेंद्र शिर्के, ट्रॅफिक पोलिस नितेष भोसले, पोलिस कॉन्स्टेबल गणेश सणस तसेच एमएसएफचे कर्मचारी उपस्थित होते.
या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांना चांगलाच इशारा मिळाला असून, भविष्यातही अशा प्रकारच्या संयुक्त कारवाया नियमितपणे सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
: टॅक्सी युनियनच्या निवेदनानंतर अवघ्या २४ तासांत कारवाई
बसस्थानक परिसरातील बेकायदेशीर पार्किंगबाबत पाचगणी टॅक्सी युनियनने नुकतेच पाचगणी पोलिस स्टेशनला निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अवघ्या २४ तासांच्या आत संयुक्त कारवाई करून बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले असून, बसस्थानक परिसरात शिस्तबद्ध वाहतुकीसाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले.

