स्ट्रॉबेरीच्या शेतातच प्रचार; वंदनाताई भिलारे यांचा मतदारांशी थेट संवाद”
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गटांतर्गत भिलार गणातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वंदनाताई भिलारे यांनी ऐन निवडणूक काळात प्रचाराची एक वेगळी आणि लक्षवेधी नीती अवलंबली आहे. पारंपरिक सभा-मेळाव्यांपेक्षा थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देत त्यांनी चक्क स्ट्रॉबेरी शेतीची वाट धरली आहे. शेतात राबणाऱ्या स्ट्रॉबेरी उत्पादक मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतल्याने या प्रचार पद्धतीला शेतकरी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भिलार गटातील उमेदवार संजय केळगणे, भिलार गणातील उमेदवार वंदनाताई भिलारे तसेच मेटगुताड गणातील उमेदवार शंकुतला चोरमले हे तिन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार सध्या जोमाने प्रचारात उतरले आहेत. सकाळी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्यानंतर दुपारी व संध्याकाळी थेट शेताच्या बांधावर पोहोचून कष्टकरी मतदारांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे. शेतात कामासाठी व्यस्त असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन भेटल्याने प्रचाराला वेगळीच धार मिळाली आहे.
महाबळेश्वर तालुका शेतीप्रधान असल्याने सध्या शेतीकामांचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. विशेषतः स्ट्रॉबेरी हंगाम जोमात सुरू असून त्यासोबतच इतर हंगामी पिकांचीही कामे चालू आहेत. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर दिवसभर शेतातच व्यस्त असल्याचे चित्र आहे. यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनाच त्यांच्या कामाच्या ठिकाणी जावे लागत आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रचाराची रणनीती बदलत आहेत. गावोगावी सकाळी घरभेटी, तर दुपारी व संध्याकाळी शेतावर जाऊन थेट संवाद असा प्रचाराचा दिनक्रम त्यांनी आखला आहे. यामुळे प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि श्रम खर्च करावे लागत असले तरी मतदारांशी थेट नाते निर्माण होत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

