जनसामान्यांचा आवाज म्हणून गोरखनाथ महाडिक मैदानात; खर्शी–बारामुरे गणात अभूतपूर्व जनसमर्थन”

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच जावळीचे नेतृत्व वसंतराव मानकुमरे यांचे खंदे समर्थक आणि खर्शी–बारामुरे गणातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोरखनाथ महाडिक हे जनसामान्यांचा आवाज म्हणून ही निवडणूक लढवत असून, युवा आयडॉल म्हणून त्यांना सर्वत्र उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याची ओळख, साधी राहणी आणि थेट जनतेशी संवाद हीच त्यांची खरी ताकद ठरत असल्याचे चित्र सध्या संपूर्ण गणात दिसून येत आहे.

प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता, खर्शी–बारामुरे गणातील माय–बाप जनता मला मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, असा ठाम विश्वास गोरखनाथ महाडिक यांनी व्यक्त केला आहे. जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद हेच माझे खरे भांडवल असल्याचे ते सातत्याने सांगत आहेत.

आज रामवाडी येथे श्रीरामांचे दर्शन घेऊन श्रीरामाच्या साक्षीने विजयाचा संकल्प करत महाडिक यांनी प्रचाराचा धडाका लावला. रामवाडी गावात घराघरांत जाऊन त्यांनी प्रत्येक मतदाराशी थेट संवाद साधला. या वेळी महिलांनी गोरखनाथ महाडिक यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले आणि विजयाची हमीही दिली. या भावनिक क्षणांनी प्रचाराला वेगळेच बळ मिळाले.

महाडिक यांनी अत्यंत साध्या, आपुलकीच्या आणि घरगुती पद्धतीने मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. “मी कोणत्याही मोठ्या घराण्यातील उमेदवार नाही, तर तुमच्याच घरातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे,” ही भावना ते प्रत्येक भेटीतून मांडत असून, हीच भावना मतदारांच्या मनाला भिडताना दिसत आहे. त्यामुळे तरुणांसह ज्येष्ठ मतदारांमध्येही त्यांच्याविषयी आपुलकी वाढत आहे.

या प्रचार दौऱ्यात भाजपच्या जावळी तालुका महिला अध्यक्ष मीनाक्षी बेलोशे, बेलोशीचे सरपंच उमेश बेलोशे, दापवडीचे सरपंच महादेव बेलोशे, रांजणीचे सरपंच विठ्ठल रांजणे, महुचे माजी सरपंच विठ्ठल गोळे यांच्यासह महादेव बेलोशे, कृष्णा गोळे, रोहिदास मोरे, रामदास गलगले, गणेश पाडळे, संदीप गोळे आणि सचिन गोळे आदी दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध गावांतील सरपंचांनीही गोरखनाथ महाडिक यांना जाहीर पाठिंबा दर्शवला.

यावेळी अनेक सरपंचांनी गावागावांत पोहोचलेली विकासाची गंगा ही केवळ शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून आणि वसंतराव मानकुमरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच शक्य झाल्याचे स्पष्टपणे सांगितले. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर झालेली ठोस कामे जनतेसमोर मांडत महाडिक मतदारांचा विश्वास अधिक दृढ करत आहेत.

गावोगावी फिरताना महिला भगिनींकडून ओवाळून आशीर्वाद, तर वृद्धांकडून विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. “येथील जनतेने केवळ आश्वासने नाही तर प्रत्यक्ष विकास अनुभवला आहे, त्यामुळे विजयाची खात्री मला आहे,” असे प्रतिपादन गोरखनाथ महाडिक यांनी प्रचारादरम्यान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!