पांचगणी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : प्रजासत्ताक दिनी १२ लाखांचे ३० गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : पांचगणी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या नागरिकांचे तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले होते. या पार्श्वभूमीवर गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांनुसार पांचगणी पोलीस ठाण्याच्या सायबर विभाग व गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ मोबाईलचा सखोल तपास हाती घेतला.


पोलिसांनी आपल्या बुद्धी कौशल्याचा आणि आधुनिक तांत्रिक माहितीचा प्रभावी वापर करत पांचगणी पोलीस ठाणे हद्दीतील तसेच आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गावांमध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबवली. या मोहिमेत विविध कंपन्यांचे एकूण ३० मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत सुमारे १२,००,००० रुपये इतकी आहे.

हे सर्व मोबाईल संबंधित तक्रारदार नागरिकांना परत करण्यात आले आहेत.
आपला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे मनापासून आभार मानले. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. विशेष म्हणजे, प्रजासत्ताक दिनी या उल्लेखनीय कामगिरीचा नगराध्यक्ष दिलीप बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, सर्व नगरसेवक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी (सातारा), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कबुकर (सातारा) व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे (वाई विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार तसेच सायबर व गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलीस अंमलदार उमेश रामचंद्र लोखंडे आणि अमोल धर्मू जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!