अर्ज माघारीनंतर महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; २१ उमेदवार रिंगणात, तळदेव गणात चौरंगी कुंभरोशीमध्ये पंचरंगी लढती ; भिलार गटात महायुतीत रंगणार सामना..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १७ उमेदवारांनी आपले २९ उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता एकूण २१ उमेदवार अंतिम रिंगणात उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून तळदेव मध्ये चौरंगी तर कुंभरोशीत पंचरंगी लढती तर सर्वच ठिकाणी महायुतीत रंगणार सामना..

जिल्हा परिषदेच्या दोन गटांमध्ये आता एकूण ६ उमेदवार मैदानात आहेत. तळदेव गटात ९ पैकी ६ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. भिलार गटात ७ पैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून येथेही ३ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या चार गणांमध्ये एकूण १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. कुंभरोशी गणात १० पैकी ५ उमेदवारांनी माघार घेतल्याने ५ उमेदवार उरले आहेत. तळदेव गणात ११ पैकी ७ उमेदवारांनी माघार घेतली असून ४ उमेदवार मैदानात आहेत. मेट–गुताड गणात ५ पैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३ उमेदवार उरले आहेत, तर भिलार गणात ८ पैकी ५ उमेदवारांनी माघार घेतली असून येथे ३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
राजकीय समीकरणांचा विचार करता, तळदेव गटात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना अशी चौरंगी लढत होणार आहे. कुंभरोशी गणात अपक्षांनी माघार न घेतल्याने येथे पंचरंगी लढत रंगणार आहे. भिलार गट व भिलार गणात भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची शिवसेना अशी तिरंगी लढत होणार आहे. मेट–गुताड गणातही राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत होण्याचे चित्र आहे.
तळदेव गट व इतर काही गणांमध्ये जरी तिरंगी किंवा चौरंगी लढती असल्या तरी मुख्य सामना राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना यांच्यातच रंगणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अर्ज माघारीनंतर आता प्रचाराला वेग आला असून येत्या काही दिवसांत संपूर्ण तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तीव्र होणार आहे.

