महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; भिलारमध्ये महायुतीतच संघर्ष, तळदेव–कुंभरोशीत बहुरंगी लढती

Spread the love

पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांतील निवडणूक चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर सर्वच गट-गणांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार असून उद्यापासून प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे. तालुक्यावर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपली सत्ता कायम राखणार की शिंदे गटाची शिवसेना तालुक्यात आपली ताकद प्रस्थापित करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

भिलार जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीतीलच तीन घटक आमनेसामने येणार असल्याने ही लढत अधिकच लक्षवेधी ठरणार आहे. येथे रंजना संजय कदम (भाजप), संजय चंदर केळगणे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि प्रदीप विठ्ठल चपटे (शिवसेना) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. याच गटातील भिलार गणात पूनम निलेश गोळे (शिवसेना), वंदना प्रवीण भिलारे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि सुप्रिया अनिल भिलारे (भाजप) यांच्यातही तिरंगी सामना रंगणार आहे. मेट–गुताड गणात शकुंतला रमेश चोरमले (राष्ट्रवादी काँग्रेस), वैशाली संतोष जाधव (शिवसेना) आणि अमिना नदीम शारवान (भाजप) यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याने या संपूर्ण परिसरात महायुतीतील अंतर्गत संघर्षच अधिक गाजण्याची चिन्हे आहेत.

तळदेव जिल्हा परिषद गटात संजय रामचंद्र गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस), अजित रामचंद्र संकपाळ (शिवसेना) आणि सुभाष महादेव सोंडकर (भाजप) यांच्यात तिरंगी लढत असली तरी प्रत्यक्षात ही लढत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. तळदेव गणात संजय महादेव उतेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), अभिषेक आत्माराम शिंदे (मशाल), संजय विठ्ठल शेलार (धनुष्यबाण) आणि गोविंद देवजी सपकाळ (भाजप) यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. कुंभरोशी गणात मात्र सचिन श्रीरंग उतेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), सुरेश हरिभाऊ जाधव (भाजप), संजय हरिश्चंद्र मोरे (शिवसेना), समीर मधुकर चव्हाण (अपक्ष) आणि सनी अशोक मोरे (अपक्ष) यांच्यात पंचरंगी सामना रंगणार आहे.

एकूणच महाबळेश्वर तालुक्यात यावेळी जवळपास सर्वच ठिकाणी बहुरंगी आणि चुरशीच्या लढती होत असून विकासकामे, स्थानिक प्रश्न, तसेच पक्षांतर्गत समीकरणे यावरच निवडणूक प्रचाराचा भर राहणार आहे. उद्यापासून प्रचाराचा जोर वाढणार असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!