धरणग्रस्तांचा राजकीय एल्गार! म्हसवे गटातून संतोष शिराळेंना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी..!

Spread the love

‘हक्काच्या लढ्यासाठी लढाऊ चेहरा हवा’ — वहागावसह आठ गाव पंचक्रोशीचा निर्धार.!!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : महू धरणासाठी पूर्णपणे विस्थापित झालेल्या वहागावसह आठ गाव पंचक्रोशीतील धरणग्रस्तांनी यावेळी आपल्या हक्काच्या लढाईसाठी थेट राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासनदरबारी प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा वहागाव ग्रामपंचायत सदस्य संतोष शिराळे यांना जिल्हा परिषद ‘म्हसवे’ गटातून उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महू धरणामुळे वहागाव पूर्णतः बाधित झाले असून, पुनर्वसनानंतरही अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या समस्यांसाठी संतोष शिराळे आणि त्यांच्या पत्नी सरपंच संगीता शिराळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने संघर्ष केला आहे. वरिष्ठ कार्यालयांशी पत्रव्यवहार असो वा थेट आंदोलन — शिराळे दाम्पत्याने नेहमीच ग्रामस्थांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे, संतोष शिराळे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून केवळ वहागावच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यातील धरणग्रस्तांचा आवाज बुलंद केला आहे.


वहागाव येथे नुकत्याच झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत संतोष शिराळे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच आठ गाव पंचक्रोशीतही “धरणग्रस्तांचे प्रश्न समजून घेणारा आणि ते सोडवण्याची ताकद असलेला लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेत हवा,” असा सूर उमटला आहे. भाजपच्या माध्यमातून आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी या तरुण, अभ्यासू आणि संघर्षशील नेतृत्वाला संधी द्यावी, अशी स्पष्ट मागणी ग्रामस्थांनी केली आहे. असून आठ गाव पंचकोर्शी या निमित्ताने एकवटल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला उपसरपंच अरुण रांजणे, ज्ञानेश्वर रांजणे, अंकुश रांजणे, शंकर रांजणे, शिवराम रांजणे, हणमंत रांजणे, उत्तम रांजणे, विनोद कांबळे, बापू गुरव, शिवाजी रांजणे, दत्तात्रय पवार, रमेश रांजणे, अजित गुरव, हेमंत राजपुरे, कुमार रांजणे, कुणाल चिकणे, नंदा रांजणे, सूर्यकांत शिराळे, समीर शिराळे, सरपंच संगीता शिराळे, श्रावण कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

वहागाव ग्रामस्थ आणि आठ गाव पंचक्रोशीच्या या आक्रमक भूमिकेमुळे म्हसवे गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ग्रामस्थ ज्ञानेश्वर रांजणे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले,

“आम्ही आमची घरदार धरणासाठी दिली, पण आजही आमचे प्रश्न सुटलेले नाहीत. संतोष शिराळे हे आमच्या सुख-दुःखातले सोबती आहेत. त्यांनी पत्रकारितेच्या आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचा आवाज बुलंद केला आहे. त्यांना जिल्हा परिषदेत संधी मिळाल्यास धरणग्रस्तांच्या प्रश्नांना निश्चितच गती मिळेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!