जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आकाश उंबरकरची पुणे पोलिसात भरती; कासवंड गावाचा अभिमान उंचावला

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड या डोंगरकपारी वसलेल्या दुर्गम गावातील कु. आकाश हनुमंत उंबरकर या युवकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणे पोलिस दलात भरती होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशामुळे कासवंड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


आकाश उंबरकर हा अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेला युवक आहे. त्याचे आई-वडील शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी, मार्गदर्शनाचा अभाव आणि कठीण परिस्थिती असूनही आकाशने कधीही हार मानली नाही. स्वतःच्या जिद्दीच्या बळावर त्याने अभ्यास सुरू ठेवत सलग पाच वर्षे अथक परिश्रम घेतले आणि अखेर आपले स्वप्न साकार केले.
डोंगराळ भागातील मर्यादित साधनसामग्रीतून शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करत त्याने स्वतःवर विश्वास ठेवला. नियमित व्यायाम, अभ्यास आणि शिस्तबद्ध दिनचर्या याच्या जोरावर त्याने पोलिस भरतीची कठीण परीक्षा यशस्वीरीत्या पार केली. त्याच्या या यशाने केवळ कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण गावाचे नाव उजळले आहे.
आकाशच्या यशाबद्दल ग्रामस्थांनी त्याचे विशेष कौतुक करत अभिमान व्यक्त केला आहे. अनेकांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या यशामुळे परिसरातील तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
“जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते. नशिबात काहीही लिहिलेले असो, प्रयत्नांच्या जोरावर त्यावर मात करता येते,” असा संदेश देत आकाश उंबरकरने देशसेवेची इच्छा असलेल्या तरुणांना प्रेरित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!