दिशादर्शक फलकाअभावी अपघात; पाचवड–पाचगणी रस्त्यावर युवक खड्ड्यात पडून जखमी. आंबेघर – करहर दरम्यानच्या नवीन पुलाजवळी घटना ;
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी / पाचवड : पाचवड–पाचगणी रस्त्यावर आंबेघर–करहर दरम्यान सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून, संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका एका युवकाला बसला आहे. भागवली (ता. जावळी) येथील मच्छिंद्र सणस हा युवक मंगळवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घराकडे जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह थेट खड्ड्यात पडून जखमी झाला.

करहर–आंबेघर दरम्यान सध्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून, या कामामुळे मूळ रस्त्याऐवजी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, सूचक फलक तसेच सूचना फलक लावलेले नाहीत. परिणामी, विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याचा योग्य अंदाज येत नाही.
मच्छिंद्र सणस हे आपले काम आटोपून दुचाकीवरून घराकडे निघाले असताना अचानक समोरचा रस्ता बदलल्याचा अंदाज न आल्याने ते थेट पुलाच्या बांधकामाजवळील खड्ड्यात कोसळले. या अपघातात ते जखमी झाले असून, त्यांच्या दुचाकीलाही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुलाचे काम सुरू झाल्यापासून याच ठिकाणी यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात घडले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र याकडे ना संबंधित ठेकेदार लक्ष देत आहे, ना प्रशासन गांभीर्याने दखल घेत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
वेळेत योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक, सूचना फलक तसेच रिफ्लेक्टर बसवले असते, तर हा अपघात सहज टाळता आला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून या मार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

