जावळीला पर्यटन तालुका जाहीर करून महाबळेश्वर प्रकल्पात समाविष्ट करावे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनातून मागणी..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : निसर्गसंपदेने नटलेल्या जावळी तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. याचा विचार करून जावळी पर्यटन तालुका म्हणून जाहीर करून महाबळेश्वर प्रकल्पात समाविष्ट करावा असा आशयाचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांना आ. शशिकांतजी शिंदे पर्यटन सेवा सह संस्था महू, यांच्या वतीने देण्यात आले.

हे निवेदन देताना आ.शशिकांतजी शिंदे पर्यटन संस्थेचे अध्यक्ष सुशिल विष्णुपंत गोळे व पदाधिकारी तसेच दापवडी पंचक्रोशी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष विजय चोरट व पदाधिकारी उपस्थित होते
निवेदनात म्हंटल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील जावली तालुका हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक तालुका आहे. देशभरातून पर्यटक पर्यटनाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी साताराहून मेढा मार्गे आणि पाचवडहून कुडाळ – करहर मार्गे असे दोन्ही मार्ग जावली तालुक्याच्या पूर्वे कडून पश्चिमेकडे जात आहेत.
तालुक्यामध्ये किल्ले वैराटगड, महू-हातगेघर धरण प्रकल्प, वडाचे म्हसवे, श्री क्षेत्र मेरुलिंग देवस्थान, कण्हेर धरण, श्री काळूबाई देवस्थान कुसुंबी, प्रतिपंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान करहर, एकीव धबधबा मेढा, कास – बामणोली व नियोजित बोंडारवाडी धरण प्रकल्प इत्यादी पर्यटन स्थळे असून पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे.
पाचवड पाचगणी रस्त्यावरील महू धरण व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांचे डेस्टिनेशन झाले आहे पाचगणी-महाबळेश्वरला पर्यटनस्थळाला जाणारे पर्यटक इथे थांबून निसर्गसौंदर्य नजरेत कैद करीत आहेत. पर्यटकांचा वाढता ओढा पहाता.
जावली तालुका हा पर्यटन तालुका जाहीर करण्यात यावा अन्यथा नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये समविष्ट करून घेण्यात यावा त्यामुळे राज्याच्या पर्यटन विभागाचे महाराष्ट्र पर्यटन धोरण २०१६ मधील तरदुती नुसार पर्यटन रोजगाराच्या अनेक संधी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना उपलब्ध होण्यास मदत होईल.

