पानस फाटा–पानस रस्त्यावर साईडपट्यांचा अभाव; टेम्पो थेट शेतात पलटी, बांधकाम विभागावर निष्काळजीपणाचा टेम्पो चालकास फटका..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पानस फाटा ते पानस रस्त्याचे डांबरीकरण करताना पानस फाटा ते पाटील ढाबा ३०० मीटर अंतरापर्यंतच्या साईडपट्यांचा अभाव आणि अरुंद रस्ता यामुळे आज दुपारच्या सुमारास एका टेम्पोचा अपघात झाला. रस्त्याचा योग्य अंदाज न आल्याने टेम्पो थेट शेतात पलटी झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जावळी तालुक्यातील पाचगणी–करहर मुख्य मार्गावरील पानस फाटा स्टॉप येथून पानस, विवर, कावडी आदी गावांकडे जाणारा हा महत्त्वाचा संपर्क रस्ता आहे. पानस फाट्यापासून पाटील धाब्यापर्यंत सुमारे ३०० मीटर अंतरापर्यंत रस्ता अत्यंत अरुंद असून काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. अलीकडेच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र हे काम ‘कट टू कट’ पद्धतीने करण्यात आले असून दोन्ही बाजूंना आवश्यक असलेल्या सुमारे दोन फूट साईडपट्या राखण्यात आल्या नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आज दुपारी एक टेम्पो चालक समोरून येणाऱ्या वाहनाला मार्ग देत असताना रस्त्याच्या कडेला पुरेशी साईडपट्टी नसल्याने वाहनाचा तोल गेला आणि टेम्पो थेट शेतात जाऊन पलटी झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच उद्धव सेनेचे तालुका प्रमुख नितीन गोळे, सागर गुजर, सुनील भिंताडे, सुमित गावडे,अजित गावडे, मनोज गावडे, व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने पलटी झालेला टेम्पो बाहेर काढण्यात आला. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य केले.
या प्रकरणी नितीन गोळे यांनी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर थेट आरोप करत, “डांबरीकरण करताना साईडपट्या राखणे अत्यावश्यक असते. मात्र संबंधित विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,” अशी मागणी केली.
सोबत फोटो :

