संघर्षाच्या पायरीवरून विकासाच्या शिखराकडे – वाळंजवाडीच्या विश्वासाचे नेतृत्व सरपंच उमेश पाडळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
खडतर परिश्रमातून घडलेले, संघर्षातून उभे राहिलेले आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचा सातत्याने ध्यास घेतलेले वाळंजवाडी (ता. जावळी) येथील शांत, संयमी व कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणजेच सरपंच उमेश पाडळे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाकडे मागे वळून पाहताना घेतलेला मागोवा..

महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे यांच्या छत्रछायेत वावरताना त्याचे मिळालेलं मार्गदर्शन आणि राजकारणाचे बाळकडू प्राप्त झाले आहे. त्यांच्याच मुशीत हे व्यक्तिमत्व खुलले आहे. तोच परिपाठ गिरवत उमेश यांनी वाळंजवाडीचे सरपंच पद दोन वर्षापूर्वी हातात घेतले असून गावासाठी धडपडण्याची त्यांची वृत्ती एक दिवस वाळंजवाडीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही.
हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण गावाच्या प्रगतीचा प्रवास असल्याचे प्रकर्षाने जाणवते. दुर्गम जावळी तालुक्याच्या डोंगरकपऱ्यात, महाबळेश्वरच्या पायथ्याशी वसलेल्या वाळंजवाडी गावात जन्मलेल्या उमेश पाडळे यांनी आयुष्याच्या सुरुवातीपासूनच संघर्षाशी मैत्री केली. सुमन मोटेल्स, महाबळेश्वर येथून त्यांनी नोकरीची सुरुवात केली. रोज सकाळी वाटिंबे मार्गे डोंगर चढून कामावर जाणे आणि संध्याकाळी पुन्हा डोंगर उतरून गावात परत येणे हा नित्यक्रम त्यांनी अनेक वर्षे अविरतपणे पाळला. या कष्टमय प्रवासानेच त्यांच्या जिद्दीला धार दिली आणि नेतृत्वाला आकार दिला.
नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी गावाकडे पाठ फिरवली नाही. उलट, गावातील शाळकरी मुलांना इंग्लिश व गणित यांसारख्या अवघड विषयांमध्ये मार्गदर्शन करत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. आज विविध क्षेत्रांत उच्चशिक्षित झालेली युवा पिढी अभिमानाने “आमच्या जडणघडणीत उमेश दादांचा मोठा वाटा आहे” असे सांगते, हीच त्यांच्या सामाजिक कार्याची खरी पोचपावती आहे.
आज ते महाबळेश्वर येथे साई यशश्री हॉटेलचे उत्कृष्ट व्यवस्थापन सांभाळत असतानाच, वाळंजवाडीच्या विकासाचे स्वप्न डोळ्यांत जपून त्यासाठी झपाट्याने काम करत आहेत. सरपंच म्हणून कार्यरत असताना साधेपणा, पारदर्शकता आणि सर्वांना सोबत घेऊन निर्णय घेण्याची वृत्ती ही त्यांच्या नेतृत्वाची ओळख बनली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न गावकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत.
कोणताही गाजावाजा न करता, ठाम निर्णयक्षमता आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी वाळंजवाडीच्या विकासाला नवी दिशा दिली. गावकऱ्यांच्या अडचणी ऐकून त्यावर संवेदनशीलपणे तोडगा काढणे, तसेच तरुणांना विकासप्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेणे हा त्यांचा दृष्टिकोन आज वाळंजवाडीला प्रगतीपथावर घेऊन जात आहे. “गावाचा विकास म्हणजेच आपली जबाबदारी” या भावनेतून काम करणारे उमेश पाडळे (सरपंच) आज वाळंजवाडीच्या विश्वासाचे आणि आशेचे प्रतीक बनले आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या स्वप्नांना अधिक उंच भरारी मिळो, वाळंजवाडी विकासाचे ध्येय पूर्णत्वास जावो आणि त्यांचे कार्य असेच प्रेरणादायी राहो, हीच सर्व ग्रामस्थांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. 🌿✨
शब्दांकन: दिलीप पाडळे ( पाचगणी)
मोबाईल : ९९२३४०५०
५१/ ८२७५३६०१७१

