टेबल लँडच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – राजेंद्रशेठ राजपुरे पाचगणी येथे टेबललँड व्यापारी असो. वतीने सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार..!

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले टेबल लँड हे पाचगणी शहराचे प्रमुख वैभव असून या पर्यटनस्थळाला अधिक सुशोभित, स्वच्छ व आकर्षक बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. टेबल लँडच्या विकासासाठी लागणारा आवश्यक निधी ना. मकरंदआबा पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी केले.

पाचगणी तालुका महाबळेश्वर येथील टेबल लँड व्यापारी असोसिएशनच्या वतीने पाचगणी नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.

राजेंद्रशेठ राजपुरे पुढे म्हणाले की, टेबल लँडच्या समस्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या व त्याची सखोल जाण असलेले लोकप्रतिनिधी आज नगरपालिकेच्या सत्तेत आले आहेत. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी आपल्या समस्या हक्काने मांडाव्यात; मात्र त्याचवेळी पालिकेला सकारात्मक सहकार्य करणेही तितकेच गरजेचे आहे. सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केल्यास टेबल लँडला सर्वांगसुंदर करता येईल. विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

श्री घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी सांगितले की, टेबल लँड परिसरात आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका सज्ज आहे. मात्र येथील व्यावसायिकांनी पर्यटकांशी सहकार्याची व सकारात्मक भूमिका घ्यावी. संध्याकाळी तळवी परिसर महाबळेश्वर लेकप्रमाणे आकर्षक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. भविष्यातील पर्यटन टिकवण्यासाठी दीर्घकालीन व नियोजनबद्ध विचार आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी नगरसेवक नरेंद्र बिरामणे यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास पाचगणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांच्यासह नगरसेवक शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामणे, प्रकाश गोळे, महेश खांडके, राजेंद्र पारठे, आकाश बगाडे, परवीन मेमन, राजश्री सणस, माधुरी कासुर्डे, सुप्रिया माने, शिल्पा माने, स्वाती कांबळे, अमृता गोळे, विमल भिलारे आदी उपस्थित होते.

तसेच टेबल लँड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे, सचिव दिलीप कांबळे, खजिनदार अनिल वन्ने यांच्यासह राहुल बगाडे, निलेश मोरे, नाना रांजणे, दादा चुनाडे, राजेश बगाडे, रोहित बगाडे, राहुल शिंदे, जमीर क्षीरसागर, नजीर क्षीरसागर, संदीप सोडणवर, मनोज जानकर, विराज चव्हाण, सचिन जानकर आदी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात नामदेव चोपडे यांनी मार्गदर्शन केले. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचलन केले तर दिलीप कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!