आमिर खान यांच्या पाचगणीतील निवासस्थानी मंत्री मकरंद (आबा) पाटील यांची सदिच्छा भेट; कला मनोरंजन विषयांवर मनमोकळी चर्चा
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सिनेअभिनेता आमिर खान यांच्या पाचगणी येथील निवासस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान कला, समाज, सांस्कृतिक मूल्ये तसेच विविध समकालीन विषयांवर सखोल व मनमोकळी चर्चा झाली. अत्यंत आपुलकीच्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणात ही भेट पार पडली.

पाचगणी आणि आमिर खान यांचे नाते केवळ व्यावसायिक न राहता भावनिक असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. डिसेंबर २००५ मध्ये आमिर खान यांनी किरण राव यांच्यासोबत पाचगणी येथे विवाह केला होता. त्यामुळे हे ठिकाण त्यांच्या आयुष्यात विशेष स्थान राखून आहे.

पाचगणीतील सुमारे दोन एकर परिसरातील त्यांचा भव्य बंगला शांतता आणि विश्रांतीचे केंद्र मानला जातो. येथे ते कुटुंबीय व मित्रांसोबत वेळ घालवत असल्याचेही ज्ञात आहे.
‘लगान’ या गाजलेल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर खान यांचे पाचगणीशी नाते अधिक दृढ झाले. येथील निसर्गसौंदर्य, आल्हाददायक हवामान आणि शांत वातावरण त्यांना विशेष भावले. शहराच्या धावपळीपासून दूर राहण्यासाठी पाचगणी हे त्यांचे आवडते ठिकाण असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. तसेच भारतातील स्वच्छ शहरांपैकी एक म्हणून पाचगणीची ओळख असल्याबद्दल त्यांनी अभिमानही व्यक्त केला आहे.
एकूणच, पाचगणी हे आमिर खान यांच्यासाठी केवळ विश्रांतीचे ठिकाण नसून त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचे आणि अंतर्मुख शांततेचे प्रतीक ठरले आहे. अशा या ठिकाणी मंत्री मकरंदआबा पाटील यांची झालेली सदिच्छा भेट सांस्कृतिक आणि सामाजिक संवादाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

