सत्ताबदलानंतर नवा राजकीय डाव : लक्ष्मी कराडकर यांचा चार नगरसेवकांसह भाजप प्रवेश
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणीच्या राजकारणात आज एक महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम घडवणारी घटना घडली असून, सलग १५ वर्षे नगरपालिकेवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पाचगणीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सातारा येथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील भाजपचे नगरसेवक व नगराध्यक्षांचा विशेष सरकार सोहळा पार पडला. या सोहळ्यात लक्ष्मी कराडकर यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
पाचगणी नगरपालिकेवर कराडकर गटाची गेली १५ वर्षे निर्विवाद सत्ता होती. विकासकामे, प्रशासकीय पकड आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर त्यांनी शहराच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला होता. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत कराडकर गटाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. या निवडणुकीत पराभव स्वीकारत कराडकर यांना प्रथमच सत्तेपासून दूर राहावे लागले.
सत्तेची समीकरणे बदलल्यानंतर आणि आगामी काळात शहरातील आपले राजकीय अस्तित्व अधिक भक्कम करण्यासाठी लक्ष्मी कराडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पाचगणीच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी सुरू झाली आहे.
या प्रवेशप्रसंगी केवळ लक्ष्मी कराडकरच नव्हे, तर त्यांच्या समवेत पाच नगरसेवकांनीही भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. यात माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर, वैभव कराडकर, प्रसाद कारंजकर, विनोद बिरामणे आणि अभिलाषा कराडकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून पाचगणीच्या विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली.
राष्ट्रवादीकडे सत्ता गेल्यानंतर कराडकर गट काहीसा बॅकफूटवर असल्याचे चित्र होते. मात्र, थेट सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पाचगणीत भाजप एक सक्षम आणि प्रभावी विरोधी शक्ती म्हणून उभा राहिला आहे. लक्ष्मी कराडकर यांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आणि त्यांच्या सोबत असलेली नगरसेवकांची ताकद यामुळे नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीला आता अधिक आक्रमक आणि संघटित विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
या राजकीय घडामोडीमुळे पाचगणीतील राजकारण अधिक चुरशीचे झाले असून, येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा नवा आणि तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

