“पुस्तकांचे गाव’ ही भिलारची ओळख भाजपने दिली; भिलारचा विकास टिकवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही – ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले..! निधीचा मलिदा तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांना या निवडणुकीत हद्दपार करा : अशी घणाघाती टीका डी. एम. बावळेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली..
निधीचा मलिदा तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांना या निवडणुकीत हद्दपार करा : अशी घणाघाती टीका डी. एम. बावळेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गावाला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून जागतिक ओळख मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य भारतीय जनता पक्षानेच केले असून, या ओळखीबरोबरच गावाचा सर्वांगीण विकास कायम राखायचा असेल, तर भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे ठाम प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

भिलार गणातील भाजपच्या उमेदवार सौ. सुप्रिया अनिल भिलारे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रचार सभेला चिन्मय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, नितीनदादा भिलारे, लक्ष्मी कऱ्हाडकर, तानाजी भिलारे, किसनशेठ भिलारे, विजयराव भिलारे, श्रीहरी गोळे, आशिष नायडू, भाईजी गावडे, नगरसेवक वैभव कऱ्हाडकर, नंदकुमार बावळेकर, अमोल चोरमले, नितीनभाई भिलारे, बाबाजी उंबरकर, वैशाली भिलारे, तानाजी भिलारे, उमेश गुरव, योगेश भिलारे, अनिल भिलारे, चेतन पारठे, उमेदवार रंजना कदम, सुप्रिया अनिल भिलारे तसेच मोहन गोळे, विनायक भिलारे, संतोष गोळे, चेतन पार्टे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच सभेत किसनशेठ भिलारे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला, ज्यांचे स्वागत ना. भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
ना. भोसले पुढे म्हणाले, “बाळासाहेब भिलारे दादांसारख्या मोठ्या नेत्याच्या घरातील उमेदवाराला विरोधकांनी तिकीट नाकारले, यावरून त्यांचे राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे, हे स्पष्ट होते. भाजपचे राजकारण हे केवळ सत्ताकारणापुरते मर्यादित नसून विकास हेच आमचे ध्येय आहे.”
गावठाण वाढीचा प्रश्न, स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा विषय, तसेच पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याचे काम मार्चअखेर पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटनासाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भोसे–वाई पर्यायी घाट रस्ता करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना म्हणाले, “निधी स्वतः आणायचा आणि कामे स्वतःच्या माणसांनाच वाटायची, असा कारभार सुरू आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्ते उखडत आहेत. या ‘मलिदा गँग’ला हद्दपार करण्याची हीच योग्य वेळ आहे. सुप्रिया भिलारे या निवडून येणारच आहेत, फक्त मताधिक्य वाढवायचे आहे.”
या सभेत किसनशेठ भिलारे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. ना. भोसले यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सभेचे प्रास्ताविक किसनशेठ भिलारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले, तर आभार अनिल भिलारे यांनी मानले. जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निकालांचा कल लक्षात घेता, भिलारकरांनीही विकासाच्या प्रवाहासोबत राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

