निवडणूक आली की धरणग्रस्तांचा उमाळा; प्रश्न मात्र कायम दुर्लक्षित – शशिकांत शिंदे

Spread the love

खर्शी–बारामूरे गणात शशिकांत शिंदेंच्या गावभेटी; विठ्ठल गोळेंच्या प्रचाराला जोर

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :   “निवडणूक आली की धरणग्रस्तांचा उमाळा येतो आणि निवडणूक संपताच त्यांच्या प्रश्नांवर पुन्हा मौन पाळले जाते. धरणग्रस्तांचे प्रश्न हे केवळ निवडणुकीपुरते अजेंडा बनवले जात आहेत,” अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी

पंचायत समिती खर्शी–बारामूरे गणाचे विठ्ठल गोळे यांच्या प्रचारार्थ गावभेट प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना केली.

शशिकांत शिंदे पुढे, म्हणाले की,निवडणुकीच्या काळात माध्यमांच्या माध्यमातून मतदारांची दिशाभूल केली जात आहे. मूलभूत सुविधा, पाणी, पुनर्वसन, रोजगार यासारख्या धरणग्रस्तांच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ ७० रुपयांच्या साडी वाटपापर्यंत विरोधकांची मजल गेली आहे. पाच वर्षांत जनतेसाठी ठोस कामे न करता केवळ रस्ता विकासाच्या घोषणा करून मते मागितली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, पंचायत समिती उमेदवार विठ्ठल गोळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जावळीचे भूमिपुत्र शशिकांत शिंदे सध्या खर्शी–बारामूरे गणात गावभेटी देत आहेत. या प्रचार दौऱ्यात ते थेट नागरिकांशी संवाद साधून उमेदवाराच्या भूमिकेची माहिती देत आहेत. त्यांच्या सोबत ऋषीभाई शिंदे, उद्धव सेनेचे तालुका प्रमुख नितीन गोळे, उपाध्यक्ष रवि पार्टे, शिंदे सेनेचे तालुका प्रमुख समीर गोळे, गोपाळ बेलोशे, रामदास पार्टे, रामदास रांजणे, दिगंबर रांजणे, यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गावभेटी दरम्यान धरणग्रस्तांचे प्रश्न, विकासाची दिशा आणि लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता यावर सविस्तर चर्चा झाली. “धरणग्रस्तांचे प्रश्न हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संघर्ष करणार,” असा निर्धार विठ्ठल गोळे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!