पाचगणीत अंमली पदार्थविरोधी पोलिसांची मोठी कारवाई; १० आरोपी ताब्यात, ५ लाखांचे कोकेनसदृश अंमली पदार्थासह ४२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पाचगणी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत मुंबई येथील पोलीस अभिलेखावरील आरोपी व त्यांचे साथीदार अशा एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे ५,००,००० रुपये किमतीचे कोकेनसदृश अंमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेट असा मिळून एकूण ४२,८५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या निर्देशानुसार कठोर कारवाईच्या प्राप्त आदेशानुसार १७ डिसेंबर २०२५ रोजी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती प्राप्त झाली.
प्राप्त माहितीनुसार पाचगणी येथील घाटजाई मंदिराजवळ संशयित इसम कोकेनसदृश अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याचे कळाले. या इसमाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, त्याने निळ्या रंगाची पँट व पिवळसर रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने सापळा रचण्यात आला.
१७ डिसेंबर रोजी मध्यरात्री ००.०५ च्या सुमारास विस्टा ग्रँड सोसायटीमधील ‘इस्टेला-१ ए’ बंगल्याजवळील पार्किंगमध्ये छापा टाकण्यात आला. तेथे पांढऱ्या रंगाची स्कोडा रॅपीड कार (एम.एच.०२ डी.एन.०२५९) व एम.जी. हेक्टर कार (एम.एच.०१ डी.के.८८०२) उभ्या असल्याचे आढळून आले. स्कोडा गाडीत ५ तर एम.जी. हेक्टर गाडीत ५ असे एकूण १० इसम मिळून आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत : महंमद नावेद सलिम परमार (वय ३२),
सोहेल हशद खान (वय ३५), महंमद ओएस रिजवान अन्सारी (वय ३२), चासिल हमीद खान (वय ३१), महंमद साहिल अन्सारी (वय ३०), जिज्ञान इरफान शेख (वय ३१), सैफ अली कुरेशी (वय २१), महंमद उबेद सिध्दीकी (वय २७), अली अजगर सादिक राजकोटवाला (वय ३०), राहिद मुख्तार शेख (वय ३१)
सर्व रा. मुंबई.
अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात ५ लाख रुपये किमतीचे कोकेनसदृश अंमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेट असा मोठा मुद्देमाल आढळून आला. चौकशीत सदर अंमली पदार्थ पाचगणी शहरात विक्री करण्यासाठी आणल्याचे आरोपींनी कबूल केले.
या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३०५/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर (स्थानिक गुन्हे शाखा, सातारा) करीत आहेत.

