हुमगाव–वाई मार्गास प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा; जावळीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न होणार साकार..!

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी व वाई तालुक्यांना जोडणाऱ्या हुमगाव–वाई या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गाला अखेर प्रमुख जिल्हा मार्गाची दर्जोन्नती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णय काढून या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. शासन निर्णय क्रमांक रवियो-२०२६/प्र.क्र.०८/नियोजन-२ मंत्रालय, मुंबई येथे निर्गमित करण्यात आला असून जावळीकरांचे अनेक वर्षांचे रस्त्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 सोबत फोटो :हुमगावं – वाई मार्गाच्या चिंचखिड घाटमार्गाचे सर्वेक्षण प्रसंगी बांधकामांचे नवनाथ जगदाळे, संदीप पवार, बुवासाहेब पिसाळ, सर्वेअर आदी..(फोटो)

गुरुवारी प्रत्यक्ष घाटमार्गाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, मेढा उपविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. यामध्ये उपविभागीय अधिकारी नवनाथ शेळके, सर्वेअर शंभूराज जाधव, दिनेश माने, विकी, कपिल जाधव, उमेश बळीप, अमित शेळके, अक्षय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप पवार तसेच हुमगावचे माजी सरपंच बुवासाहेब पिसाळ यांनीही उपस्थित राहून मार्गाच्या कामाबाबत चर्चा केली.

सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे येथील मुख्य अभियंत्यांनी दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. वाढती वाहतूक, जोडली जाणारी गावे, लोकसंख्या आणि दळणवळणातील महत्त्व लक्षात घेऊन या मार्गास प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हा परिषद, सातारा यांनीही ठराव मंजूर करून प्रस्तावास पाठिंबा दिला होता.

या निर्णयानुसार प्र.जि.मा.-१९ आखाडे–तुमगाव–वाघजाईवाडी–झगडेवस्ती–बावधान बगाळ रस्ता तसेच ग्रामीण मार्ग क्र. ५५ व २५ (ता. जावळी) आणि ग्रामीण मार्ग क्र. १६६ (ता. वाई) यांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण १२.८०० कि.मी. लांबीचे रस्ते “प्रमुख जिल्हा मार्ग-१८१” या नवीन क्रमांकाने ओळखले जाणार आहेत.

 हुमगाव ते वाई प्रत्यक्ष अंतर सुमारे १५ कि.मी. असून घाटमार्ग ६ कि.मी. आहे. भुयारी बोगद्याचा पर्याय स्वीकारल्यास केवळ ४०० मीटर बोगदा करून साडेपाच कि.मी. अंतर वाचवता येऊ शकते व वनसंपदेचे नुकसान टाळता येईल. या निर्णयामुळे ग्रामीण विकासाला निश्चितच गती मिळणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!