रमजान ईद व गुढीपाडवा पार्श्वभूमीवर पाचगणीत पोलिसांचे भव्य संचलन; शांतता व सलोख्याचा दिला संदेश
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : रमजान ईद आणि गुढीपाडवा या दोन्ही धर्मियांचे महत्त्वाचे सण एकाच कालावधीत येत असल्याने शहरात शांतता, सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाचगणी पोलिसांनी आज शहरातून भव्य संचलन काढले. या उपक्रमामुळे दोन्ही समाजातील नागरिकांमध्ये जातीय सलोखा जपला जातो. हा संचलनाचा मुख्य उद्देश आहे.

पाचगणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद आणि हिंदू बांधवांचा नववर्षाचा प्रारंभ मानला जाणारा गुढीपाडवा हे सण उत्साहात आणि शांततेत पार पडावेत, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. समाजात परस्पर सौहार्द टिकून राहावे, कोणताही तणाव निर्माण होऊ नये आणि सर्वांनी एकोप्याने सण साजरे करावेत, हा उद्देश या संचलनामागे होता.
संचलनाची सुरुवात जुने पोलीस स्टेशन येथून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामा मशिद परिसर, राहिल प्लाझा, एसटी स्टँड या शहरातील प्रमुख मार्गांवरून संचलन काढण्यात आले. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने पोलीस स्टेशन येथे संचलनाची सांगता झाली. या मार्गावरील नागरिकांनीही संचलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या संचलनात २ पोलीस अधिकारी, ८ पोलीस अंमलदार तसेच ५ एमएसएफ जवान सहभागी झाले होते. पोलिसांच्या उपस्थितीमुळे शहरातील वातावरण अधिक सुरक्षित व विश्वासार्ह असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली.

