सुरूर–पोलादपूर राज्यमार्गाचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे ठेकेदाराचे मंत्री महोदयांना आश्वासन; मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सुरूर–पोलादपूर राज्यमार्गावरील गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या संथ गतीच्या कामामुळे नागरिक, व्यापारी तसेच पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत MSRDC च्या अधिकाऱ्यांसोबत पाचगणी–महाबळेश्वर येथील शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत संबंधित ठेकेदाराने उकरलेल्या रस्त्याचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

सुरूर–पोलादपूर हा महाबळेश्वर–पाचगणी या राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडणारा प्रमुख राज्यमार्ग आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरील काम अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता उकरून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मोठमोठे खड्डे, उडणारी धूळ आणि अपूर्ण कामांमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावरही होत असल्याची नाराजी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती.

या समस्येविरोधात ८ मार्च रोजी महाबळेश्वर आणि पाचगणी येथे कडकडीत बंद पाळून नागरिकांनी एकजूट दाखवली, तर त्यानंतर आज वाई शहरातही बंद पाळण्यात आला. या आंदोलनाची दखल घेत शासनाने तातडीने मंत्रालयात बैठक बोलावून संबंधित कामांचा आढावा घेतला.

बैठकीत सुरूर–पोलादपूर राज्यमार्गावरील रखडलेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कामातील विलंबाबद्दल मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना चांगलेच खडसावले. पर्यटन हंगाम तोंडावर असताना या मार्गाची दुरुस्ती तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कामाच्या संथ गतीमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेता कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, तसेच शिष्टमंडळातील मेहुल पुरोहित, सुनील उंबरकर, नामदेव चोपडे, नंदिनी बुटाला, रोहित ढेबे, संजय जंगम आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर संबंधित ठेकेदाराने ३० एप्रिलपर्यंत उकरलेला रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून आता प्रत्यक्षात कामाला गती मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!