महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ अनुषंगाने महाबळेश्वर तालुक्यात दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही मतदान प्रक्रिया सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत शांततामय व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून प्रशासनाने त्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे.


महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी भिलार व तळदेव असे दोन गट असून पंचायत समितीसाठी भिलार, मेटगुताड, तळदेव व कुंभरोशी असे चार गण आहेत. या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ३६,२५७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १८,५५४ तर महिला मतदारांची संख्या १७,७०३ इतकी आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तालुक्यात एकूण १०९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांवर १०९ केंद्राध्यक्ष, ३२७ मतदान कर्मचारी कार्यरत असतील. तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी २४ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
आज सकाळी ८ वाजल्यापासून गिरिस्थान प्रशाला, महाबळेश्वर येथून १०९ मतदान केंद्रांसाठीची पथके मतदान साहित्यांसह रवाना करण्यात आली. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक निरीक्षक अमोल यादव, निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन म्हस्के यांचे नियंत्रण राहणार आहे. तसेच नायब तहसीलदार, झोनल अधिकारी, केंद्राध्यक्ष व इतर सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामकाजात सहभागी होणार आहेत.
प्रशासनाने सर्व मतदारांनी निर्भय व उत्साहाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले आहे.

