काव्यगंध पर्व सहावे’त कवितांचा बहारदार आविष्कार; विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा अन् आत्मविश्वास! प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या काव्यसादरीकरणाने रंगला काव्यसोहळा

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘काव्यगंध पर्व सहावे’ हा काव्यसोहळा रविवार, १८ ऑक्टोबर रोजी भोसे, ता. महाबळेश्वर येथील आयव्ही पार्क येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या दमदार काव्यसादरीकरणाने सोहळ्याला विशेष रंगत आली. त्यांच्या कवितांनी विद्यार्थ्यांच्या मनात नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि साहित्याविषयी प्रेरणा निर्माण केली.

या काव्यसोहळ्यात सातारा जिल्ह्यातील नामांकित कवींनी आपल्या बहारदार कविता सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. सामाजिक वास्तव, मानवी संवेदना, जीवनातील संघर्ष आणि भावभावनांचे विविध पैलू कवितांमधून प्रभावीपणे उलगडले. शब्दांच्या सामर्थ्याने सभागृहात कधी हास्याची कारंजी फुलली, तर कधी संवेदनशील विषयांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.

 

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सर आईन्स्टाईन अकॅडमी आणि ज्ञानगंगा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेले काव्यसादरीकरण. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या कविता सादर करत उपस्थितांची शाबासकी मिळवली. नामांकित कवींचा सहवास, त्यांचे अनुभव आणि कवितांच्या सादरीकरणाची शैली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

 

विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, मराठी भाषेची गोडी वाढावी आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. अशा साहित्यिक उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये वाचन, लेखन आणि अभिव्यक्तीची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

या सोहळ्याला नितीन भिलारे, प्रमोद पवार, दीपक चिकणे, गोविंद कासुर्डे, महेश वाघमारे, अजय कांबळे, अनिल वन्ने, साहेबराव गोळे, विकास जाधव, अप्पा जाधव, आबा भिलारे, पत्रकार रविकांत बेलोशे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. एकूणच, ‘काव्यगंध पर्व सहावे’ हा सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात साहित्यप्रेमाची ज्योत पेटवणारा आणि मराठी भाषेच्या संवर्धनाला बळ देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!