स्वच्छ शहरासाठी झटणाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित तरच समाज निरोगी” – पाचगणीत ‘प्रोजेक्ट सेफ’ अंतर्गत स्वच्छतादूतांना विशेष गणवेश वाटप
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे स्वच्छतादूत हे समाजाचे खरे आरोग्यरक्षक आहेत. त्यांच्या श्रमामुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहते. मात्र या स्वच्छतादूतांचे आरोग्य व सुरक्षितता जपली गेली, तरच समाज खऱ्या अर्थाने निरोगी होईल, असे प्रतिपादन महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या डॉ. मंजूताई हुंडेकर यांनी केले.

पाचगणी नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था व पाचगणी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद परिक्षेत्रातील ३० स्वच्छता कर्मचाऱ्यांना “प्रोजेक्ट सेफ” अंतर्गत विशेष सुरक्षात्मक गणवेशाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्वच्छतादूतांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अडचणी कमी करणे तसेच त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा आहे.
या कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, नगराध्यक्ष दिलीप बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, आरोग्य सभापती राजश्री सणस यांच्यासह नगरसेवक शेखर कासुर्डे, राजेंद्र पारठे, नारायण बिरामणे, आकाश बगाडे, महेश खांडके, अमित कांबळे, गणेश कासुर्डे, स्वाती कांबळे, शिल्पा माने, सुप्रिया माने, विमल गोळे, अमृता गोळे, परवीन मेमन, माधुरी कासुर्डे तसेच आरोग्य अधिकारी स्वाती पाटील, कर्वे संस्थेच्या विद्या जाधव, अर्चना ताटे, वर्षा बांदल, राहुल अजाणकर, ज्योत्स्ना बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय रवींद्र देव व सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वच्छतादूतांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
चौकट : “प्रोजेक्ट सेफ” अंतर्गत देण्यात आलेले हे गणवेश महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकीतून तयार केले आहेत. या गणवेशांची रचना उष्णतेपासून संरक्षण देणारी असून, हवा खेळती राहण्यासाठी विशेष कप्पे देण्यात आले आहेत. तसेच पाण्याची बाटली ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने काम करताना होणारा थकवा कमी होण्यास मदत होणार आहे.

