स्वच्छतेच्या राष्ट्रीय पुरस्कारात पाचगणीची मोहोर देशपातळीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांना पुरस्कार प्रदान ; ‘सुपर स्वच्छ लीग २०२५-२६’मध्ये पुन्हा यशाचा डंका..

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  निसर्गसौंदर्याबरोबरच स्वच्छतेची ओळख जपणाऱ्या पर्यटननगरी पाचगणीने राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ‘सुपर स्वच्छ लीग २०२५-२६’मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत मानाचा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे, सातत्यपूर्ण स्वच्छता कामगिरीच्या बळावर पाचगणीने पुरस्कारांचा चौकार मारत राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान अधोरेखित केले आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित विशेष सोहळ्यात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या गौरव सोहळ्याला नगरसेवक शेखर कासुर्डे, गणेश कासुर्डे, नगरपरिषदेचे अधिकारी आणि शहर समन्वयक ओंकार ढोले उपस्थित होते.

 

केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुपर स्वच्छ लीग’ ही विशेष श्रेणी सुरू केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२५ पासून या श्रेणीचा समावेश करण्यात आला. २०२१ ते २०२४ या चार वर्षांतील स्वच्छतेच्या कामगिरीचा विचार करून शहरांना या लीगमध्ये स्थान देण्यात आले. यंदा स्पर्धेचे निकष अधिक कठोर करण्यात आले होते. लीगमधील स्थान कायम राखण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ८५ टक्के गुण मिळवणे आवश्यक होते. पाचगणी नगरपरिषदेने हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले.

 

विशेष म्हणजे, २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पाचगणीने स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. घनकचरा व्यवस्थापन, नियमित स्वच्छता, कचऱ्याचे योग्य संकलन व विलगीकरण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि पर्यटनस्थळांचे सौंदर्य जपण्यासाठी नगरपरिषदेने विविध उपक्रम राबविले. अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता सेवक आणि नागरिकांच्या सहभागातून या कामाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

 

नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, घाटजाई विकास आघाडीचे सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सातत्याने राबविण्यात आली.

 

‘या पुरस्काराचे खरे मानकरी पाचगणीकर नागरिक आहेत. नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळेच स्वच्छतेची परंपरा टिकवता आली. हा सन्मान संपूर्ण पाचगणी शहराचा आहे,’ अशी भावना नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांनी व्यक्त केली.

 

राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या या गौरवामुळे पाचगणीच्या स्वच्छता चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून, पर्यटननगरीचा राष्ट्रीय नावलौकिक अधिक उंचावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!