महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्राथमिक अंदाजानुसार ७६ टक्के मतदान: २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद भिलार, व तळदेव, गटासाठी गटांतर्गत चार गणांत भिलार, मेट – गुताड, तळदेव, कुंभरोशी, मतदान प्रक्रियेत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ तर पंचायत समितीच्या १५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होऊन अंदाजे ७६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आहे.

भिलार गट आणि गटांतर्गत भिलार आणि मेट गुताड गण आहेत. भिलार गट आणि गणामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत झाली आहे. तर येथे कोण कोणाला वरचढ ठरणार ७२ तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तळदेव गटात तळदेव व कुंभरोशी गणात मुख्यतः शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत झाली आहे. मात्र या ठिकाणी शिंदेसेना वरचढ ठरल्याचे चित्र स्पष्ट जाणवत आहे.
चौकट : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीची तोडणी चालू असल्याने सकाळपासून तुरळक गर्दी होती. मात्र दुपारी ३: ३० नंतर शेतीचे काम आटोपल्यावर मतदारांच्या महापुरामुळे मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. या रांगातील मतदार कोणाला पावणार हे पाहण्यासाठी सोमवारची वाट पाहावी लागणार आहे.
चौकट : जिल्हा परिषदेच्या भिलार आणि तळदेव प्रत्येकी ३ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या भिलार गणात तीन तर मेट गुताड गणात तीन व तळदेव चार तर कुंभरोशी मध्ये पाच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. यामध्ये जिल्हा परिषद ६ तर पंचायत समितीचे १५ उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. ७२ तासांची प्रतीक्षा आहे.

