भिलार गणात वंदना भिलारे यांची विजयाकडे निर्णायक वाटचाल; जनतेच्या रेट्यावर दावेदारी मजबूत
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भिलार गणामध्ये वंदना भिलारे यांची विजयाची दावेदारी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालली आहे. राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, स्थानिक प्रश्नांची अचूक जाण आणि मतदारांच्या मनाची नस ओळखण्याची क्षमता यांच्या बळावर त्यांनी आपला विजय जवळजवळ दृष्टिक्षेपात आणल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात वसलेला भिलार गण हा स्ट्रॉबेरी हब म्हणून ओळखला जातो. शेती, मजूर वर्ग, महिला बचतगट आणि स्थानिक उद्योजकता यावर आधारित हा गण असल्याने येथील प्रश्नांची गुंतागुंत वेगळी आहे. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करत वंदना भिलारे यांनी या निवडणुकीत आपला प्रचाराचा अजेंडा वेळोवेळी बदलत, अधिक प्रभावी केला आहे.
राजकीय अनुभवाच्या जोरावर कधी काय बोलायचे, कुठे थांबायचे आणि मतदारांशी कसा संवाद साधायचा याचे अचूक भान त्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी नुकतीच प्रचाराची दुसरी फेरी यशस्वीपणे पूर्ण केली असून, या फेरीत त्यांना जनतेचा अधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला.
या प्रचारात त्यांना पंचायत समितीच्या माजी सभापती रूपालीताई राजपुरे, तसेच तेजस्विनी भिलारे यांचा सक्रिय पाठिंबा लाभत आहे. विशेष म्हणजे भिलार व परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला असून, महिलावर्गाचा हा पाठिंबा वंदना भिलारे यांची ताकद ठरत आहे.
महिलांचा वाढता सहभाग, घराघरात होणारा संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर दिलेली ठाम भूमिका यामुळे संपूर्ण भिलार गणात “घड्याळ” हे निवडणूक चिन्ह जनामनात रुजत चालले आहे. ‘घड्याळ मनामनात’ अशी भावना मतदारांमध्ये तयार होत असून, त्याचा थेट फायदा वंदना भिलारे यांना होताना दिसत आहे.
एकूणच भिलार गणातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, वंदना भिलारे या विजयाच्या दिशेने भक्कम पावले टाकत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. येत्या काळात त्यांच्या प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता असून, अंतिम निकालात त्याचा ठळक परिणाम दिसून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

