म्हसवे गटात भाजपचा विजयाचा ‘राजयोग’! शिवेंद्रराजेंची वसंतराव मानकुमरे यांच्यासाठी विकासाची साद; ‘महाडिक-पोफळे’ जोडीलाही मिळणार कौल!

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  म्हसवे: “म्हसवे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विकासाची कामे खेचून आणण्यासाठी वसंतराव मानकुमरे यांच्यासारखं धाडसी आणि अभ्यासू नेतृत्व हीच काळाची गरज आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा हा लोकप्रतिनिधी असून, म्हसवे गटाच्या विकासासाठी जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,” असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

म्हसवे जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार वसंतराव मानकुमरे (भाऊ), खर्शी बारामुरे गणाचे उमेदवार गोरख महाडिक आणि म्हसवे गणाच्या उमेदवार सौ. रेश्मा पोफळे यांच्या प्रचारार्थ म्हसवे येथे आयोजित झंझावाती कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी सभापती तानाजी शिर्के यांच्यासह मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

‘माणूस’ जपणारे नेतृत्व : वसंतराव मानकुमरे

ना. शिवेंद्रराजे भोसले पुढे म्हणाले की, हा गट आरक्षित असला तरी वसंतराव मानकुमरे यांनी जात-पात न पाहता सर्व समाजासाठी रक्ताचं पाणी केलं आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा आणि विकासाचा ध्यास घेणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेत माझ्या नेतृत्वाखाली ते विकासाची घोडदौड अधिक वेगाने पुढे नेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जावलीचा विकास हीच भाजपची ओळख!

“जावली तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर आम्ही रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्याच्या सुविधा पोहोचवल्या आहेत. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत भाजपचे मताधिक्य वाढत आहे,” असे नमूद करत शिवेंद्रराजेंनी मतदारांना विकासकामांची पोहोचपावती देण्याचे आवाहन केले. वसंतराव मानकुमरे, गोरख महाडिक आणि रेश्मा पोफळे या तिन्ही उमेदवारांच्या विजयामुळे म्हसवे गटात विकासाची ‘त्रिसूत्री’ अधिक मजबूत होईल, असा विश्वास सभेत व्यक्त झाला.

विकासाचा संकल्प : उमेदवारांचा निर्धार!

वसंतराव मानकुमरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सातत्यपूर्ण संपर्क आणि प्रामाणिक कामामुळेच जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पुढील काळात ही विकासाची गंगोत्री प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.” तर गोरख महाडिक आणि सौ. रेश्मा पोफळे यांनीही आपल्या गणात शिवेंद्रराजेंच्या मार्गदर्शनाखाली आदर्श विकास कामे करण्याचे आश्वासन दिले.

मान्यवरांची उपस्थिती आणि मोठा उत्साह

या सभेला भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामणे, माजी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, हिंदुराव तरडे, समाधान पोफळे, अजित इंदलकर, प्रमोद शिंदे, वैशाली कांबळे, शुभम कांबळे, अंकिता जगताप, प्रियांका कांबळे उरणकर यांच्यासह हजारो ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण म्हसवे परिसरात ‘कमळ’ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, सभेतील गर्दी उमेदवारांच्या विजयाची ग्वाही देत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!