पाचगणीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात; ३५ शाळांचा भव्य लाँगमार्च आकर्षण..! कै. भिलारे क्रीडांगणावर नेत्रदीपक देशभक्ती विविध गुणदर्शन कार्यक्रम..
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोमवार, २६ जानेवारी रोजी पाचगणीमध्ये अत्यंत उत्साहवर्धक, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळपासूनच शहरात राष्ट्रप्रेमाचे वारे वाहू लागले होते. विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा दिवस अधिकच संस्मरणीय ठरला. प्रथमतः नगरपालिकेच्या आवारात सकाळी ८ वाजता उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नगरपालिका शाळा क्रमांक १ व २ येथे ८:१५ वा. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे १० वाजता. नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. तिरंगा फडकताच संपूर्ण परिसर “जय हिंद” व “भारत माता की जय”च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
या सोहळ्यास उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, नगरसेवक शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, महेश खांडके, राजेंद्र पारठे, अमित कांबळे, आकाश बगाडे, परवीन मेमन, राजश्री सणस, अमृता गोळे, माधुरी कासुर्डे, स्वाती कांबळे, शिल्पा माने, विमल भिलारे, सुप्रिया माने, लक्ष्मी कऱ्हाडकर, अभिलाषा कऱ्हाडकर, वैभव कऱ्हाडकर, प्रसाद करंजकर, विनोद बिरामणे, सपोनी दिलीप पवार, मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्यासह विविध मान्यवर, शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली. यानंतर पाचगणीतील ३५ शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध लाँगमार्च सादर करत एकसंघता व शिस्तीचे दर्शन घडवले. पुढे कै. भाऊसाहेब भिलारे क्रीडांगणावर देशभक्तीपर गीत, पथनाट्य व विविध कला सादरीकरणांचा नेत्रदीपक कार्यक्रम झाला. देशभक्ती, सामाजिक ऐक्य व शिस्तीचा संदेश देणारा हा सोहळा पाचगणीकरांच्या स्मरणात कायम राहणारा ठरला.
चार वर्षाच्या प्रशासकीय कालावधीनंतर निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने लोकप्रतिंधीना ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. चार वर्षे निवडणुका झाल्या नसल्याने प्रशासक कारभार होता.

