पाचगणी नगरपरिषद निकालाचा उद्या रविवारी फैसला; १९ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ईव्हीएम उघडणार, सत्ता कुणाची याकडे सर्वांचे लक्ष
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या २१ जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीची उद्या रविवारी मतमोजणी होत असून १९ दिवस स्ट्रॉंगरूममध्ये बंदिस्त असलेली ईव्हीएम मशीन आज उघडली जाणार आहेत. या मतमोजणीतून ७५ उमेदवारांपैकी २० नगरसेवक तर ८ उमेदवारांमधून एक नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. नगरपरिषदेचा हा ‘कठीण पेपर’ आज निकाली निघणार असल्याने संपूर्ण पाचगणीकरांचे लक्ष निकालाकडे लागले असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पाचगणी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडली होती. १० प्रभागांतून २० प्लस १ अशा एकूण २१ जागांसाठी मतदान झाले असून या निवडणुकीत ७५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. नगरसेवक पदासाठी भाजपाने ४ तर शिवसेनेने ४ जागांसाठी पक्ष चिन्हावर उमेदवार दिले होते. मात्र नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते.
नगराध्यक्षपदाच्या लढतीत दिलीप बगाडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, तर संतोष कांबळे यांना माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी प्रत्यक्ष सक्रियता दाखवत निवडणूक रिंगणात उतरवले होते. उमेदवारांनी प्रचारासाठी केलेल्या आटापिट्यानंतर आज त्यांच्या मेहनतीचा निकाल समोर येणार असून नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याचा फैसला आज होणार आहे.
पाचगणी नगरपरिषदेची निवडणूक जरी अपक्षांची असली तरी प्रत्यक्षात दोन प्रमुख गटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. एकीकडे माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर गट, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नेतृत्व शेखर कासुर्डे प्रणित गट अशी थेट टक्कर रंगली आहे. दोन्ही गटांनी प्रत्येकी सुमारे २० उमेदवारांच्या पाठीशी उभे राहत निवडणूक लढवली असून आपलीच सत्ता नगरपरिषदेत येणार असल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला जात आहे.
चौकट :
दोन्ही गटांनी प्रत्येक प्रभागात एक न ठेवता दोन-दोन उमेदवारांच्या डोक्यावर हात ठेवत ‘जो निवडून येईल तो आपलाच’ असे सूत्र अवलंबले आहे. मात्र अपक्ष उमेदवारही राजकीय गणिते अचूक जुळवण्यात पटाईत असल्याने निकालानंतर कोणत्या गटाची सत्ता बसते हे स्पष्ट होताच आपला हुकमी एक्का पुढे करण्याची शक्यता आहे. अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही गटांमध्ये मोठी चुरस लागण्याची चिन्हे असून या साऱ्याचा उलगडा निकालानंतरच होणार आहे.

