पाचगणीत शिवजयंतीच्या निमित्ताने जय्यत तयारी.. विविध कार्यक्रमांची होणार रेलचेल
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाचगणी शहरात यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सर्वत्र भगवा साज चढला आहे. तर शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण शिवभक्तांच्या बाईकला भगव्या झेंड्याची शिवमय झालर सजली आहे. शिवजयंती उत्सव समिती, पाचगणी व पाचगणी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १९ फेब्रुवारी २०२६ रोजी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

या निमित्ताने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ४ वाजता बॉबी पॉईंट येथून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत श्री भवानी माता मंदिर येथे पोहोचणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती पार पडणार आहे.
मिरवणुकीत पारंपरिक ढोल पथक, महिला सांस्कृतिक नृत्य, जिवंत देखावे, मशाल महोत्सव, लाईट शो आणि फायर क्रॅकर शो यांचा समावेश असणार आहे. विशेष आकर्षण म्हणून स्वराज्य ढोल पथक (प्रतापगड) सहभागी होणार असून त्यांच्या सादरीकरणामुळे वातावरण दणाणून जाणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख स्थळ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचगणी हे असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शिवप्रेमींमध्ये या सोहळ्याबद्दल मोठा उत्साह असून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले असून जय्यत तयारी सुरू आहे.

