पाचगणी नगरपरिषदेच्या सत्तेचा कारभार हाती; नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी पदभार स्वीकारला.. शहर विकासाला प्राधान्य..

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणूक निकालाला दोन दिवस होत असतानाच राष्ट्रवादी पुरस्कृत नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी आज नगरपरिषद कार्यालयात जाऊन अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या वेळी राष्ट्रवादी प्रणित अपक्ष नगरसेवकांची लक्षणीय उपस्थिती होती.


पदभार स्वीकारताना नगरसेवक शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, महेश खांडके, राजेश पारटे, अमित कांबळे, आकाश बगाडे, परवीन मेमन, राजश्री सणस, विमल भिलारे, अमृता गोळे, सुप्रिया माने, माधुरी कासुर्डे, स्वाती कांबळे हे सर्व उपस्थित होते. नव्या नेतृत्वाच्या या पहिल्याच अधिकृत कार्यक्रमातून एकजूट आणि शिस्तबद्ध कारभाराचा संदेश देण्यात आला.


पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी ओळख करून घेतली. यावेळी मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांना विविध विभागांतील अधिकारी वर्गाची ओळख करून देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने तसेच उपस्थित मान्यवर नगरसेवकांकडून नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांचे अभिनंदन करण्यात आले.


यानंतर नवनिर्वाचित श्री घाटजाई शहर विकास आघाडीच्या १५ सदस्यांच्या सत्ताधारी बॉडीने नगराध्यक्ष व नगरसेवकांसह छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपली एकजूट व सामाजिक बांधिलकी व्यक्त केली. या कार्यक्रमानंतर सर्वांनी चहापान घेतले.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे म्हणाले, “नगराध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांना सोबत घेऊन पाचगणीच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. पर्यटन हा पाचगणीचा श्वास आहे. पर्यटक आले तरच शहरात रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यासाठी पार्किंगची मोठी समस्या सोडवणे अत्यावश्यक असून सुसज्ज पार्किंग व्यवस्था उभारणे हे आपले कर्तव्य आहे. त्याचबरोबर पाचगणी शहराला भेडसावणारी पाणी समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील. पाचगणीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे.”

दिलीपभाऊ बगाडे
(नगराध्यक्ष,) पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!