ज्येष्ठ नेत्या डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन; राजकारणातील बुलंद आवाज हरपला.
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा कोरेगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्टवक्तेपणा, निर्भीड भूमिका आणि संघर्षशील नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावदादा पाटील यांच्या धर्मपत्नी, माजी मंत्री, खासदार व आमदार डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांचे शनिवारी दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी मुंबईतील माहीम येथील ज्योती सदन या निवासस्थानी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एका परखड विचारांच्या, कोणाचाही मुलाहिजा न ठेवणाऱ्या आणि आयुष्यभर संघर्षाला सामोरे जाणाऱ्या राजकीय व्यक्तिमत्त्वाला मुकले आहे.

सत्यशोधक विचारांचे प्रणेते ज्योत्याजीराव फाळके पाटील यांच्या विचारपरंपरेत वाढलेल्या डॉ. शालिनीताई पाटील या ज्योतीजीराव फाळके पाटील यांच्या कन्या होत. त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिलीची पदवी मिळवली होती. सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवणे, दुर्बल घटकांच्या बाजूने ठाम उभे राहणे आणि सत्तेच्या केंद्रात असतानाही निर्भीड भूमिका घेणे, हीच त्यांच्या सार्वजनिक जीवनाची ओळख ठरली.
स्थानिक राजकारणातून राष्ट्रीय पातळीपर्यंतचा प्रवास
डॉ. शालिनीताई पाटील यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून काम करताना त्यांनी प्रशासनातील त्रुटी, ग्रामीण भागातील प्रश्न आणि शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवले. याच अनुभवातून पुढे त्यांची राजकीय भूमिका अधिक धारदार होत गेली.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जात. खासदार आणि आमदार म्हणून त्यांनी संसद व विधानसभेत प्रभावी कामगिरी बजावली. महाराष्ट्र राज्याच्या महसूल मंत्री म्हणून काम करताना त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही प्रशासकीय शिस्त आणि ठाम निर्णयक्षमतेचे उदाहरण म्हणून सांगितले जातात. कोणताही दबाव न घेता, स्पष्टपणे आपली भूमिका मांडणे ही त्यांची राजकीय शैली होती.

१९८५ साली त्यांनी सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे आपला राजकीय प्रवास वळवला. काही काळ त्या सातारारोड-पाडळी स्टेशन या आपल्या मूळ गावी वास्तव्यास होत्या. याच काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिमणगावच्या माळावर श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि संघर्षपूर्ण टप्पा ठरला. या कारखान्यासाठी परवाना मिळवताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि पशुधनाचे हाल लक्षात घेऊन त्यांनी एक वर्ष कारखाना पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि जनावरांच्या चारा छावण्यांसाठी ऊस उपलब्ध करून दिला. आर्थिकदृष्ट्या तोट्याचा असला तरी सामाजिक बांधिलकी जपणारा हा निर्णय आजही आठवला जातो.
१९९९ साली त्यांनी विधानसभेचे माजी सभापती व काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव जगताप यांचा पराभव करून त्यांच्या २५ वर्षांच्या संसदीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. या विजयानंतर कोरेगाव तालुक्यात त्यांनी स्वतःचा कारखाना गट उभा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी खासदार शरद पवार यांच्याशी असलेले जुने वैर संपवत त्यांच्या पक्षातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला. ज्येष्ठ सदस्य म्हणून मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र ती संधी मिळाली नाही. २००४ साली त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक जिंकत आपले राजकीय वजन सिद्ध केले.
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना डॉ. शालिनीताई पाटील यांनी आर्थिक निकषावर आरक्षण असावे अशी भूमिका घेत संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेला न जुमानता त्यांनी ही भूमिका संपूर्ण राज्यात आक्रमकपणे मांडली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद वाढले आणि अखेर त्यांच्यात दरी निर्माण झाली.
यानंतर त्यांनी ‘क्रांतीसेना’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी विद्यमान आरक्षण धोरणावर आक्षेप नोंदवत आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाची भूमिका ठामपणे मांडली. मराठवाडा आणि विदर्भातील त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. तत्कालीन औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) येथील विराट जाहीर सभा विशेष चर्चेचा विषय ठरली.
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांनी काँग्रेस, जनता दल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतून काम केले. मात्र पक्ष बदलले तरी विचारांशी तडजोड न करणे ही त्यांची कायमची ओळख राहिली. ज्येष्ठ नेते वसंतरावदादा पाटील आणि स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्याबरोबर त्यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणातही ठसा उमटवला.
२००९ साली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जावली मतदारसंघ रद्द झाला. त्यानंतर कोरेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली. अपक्ष उमेदवार असलेल्या डॉ. शालिनीताई पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर काही काळ त्या सातारारोड व कोरेगाव येथे, तर गेल्या काही वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होत्या.
२००७ साली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आर्थिक अडचणीत सापडलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव केला. ही प्रक्रिया कायदेशीर वादात अडकली. खासगी कंपनीकडे गेलेला कारखाना परत मिळवण्यासाठी त्यांनी स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत दीर्घ लढा दिला. या संघर्षात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही त्यांना पाठिंबा दिला.
जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातही त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविरोधात जरंडेश्वर कारखान्याच्या मुद्द्यावर तीव्र भूमिका घेतली. कारखान्यासोबतच जरंडेश्वर सहकारी बँक, वर्धनी डिस्टिलरी, कल्याणगड ऊस तोडणी वाहतूक संस्था अशा अनेक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता.
निर्भीड विचारांचा वारसा
डॉ. शालिनीताई पाटील यांचे जीवन म्हणजे संघर्ष, स्पष्टवक्तेपणा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम होता. सत्तेत असो वा सत्तेबाहेर, त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. त्यांचे निर्भीड नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांनी जपलेले मूल्य, संघर्षशील वृत्ती आणि स्पष्ट विचारांचा वारसा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजरामर राहील.

