नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पाचगणीत कडक पोलीस बंदोबस्त; हॉटेल-लॉज-बंगल्यांना नोटिसा, अमली पदार्थांवर करडी नजर.

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नवीन वर्ष २०२६ अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपले असताना संपूर्ण सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. जावळी तालुक्यातील सावरी येथे मुंबई क्राईम ब्रँचने तब्बल ११५ कोटी रुपयांच्या ड्रग फॅक्टरीचा पर्दाफाश केल्यानंतर काही दिवसांतच पाचगणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या संयुक्त कारवाईत मुंबईस्थित १० आरोपींना ताब्यात घेऊन ५ लाख रुपये किमतीचा कोकेन सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या धक्कादायक घटनांच्या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलीस यंत्रणा पूर्णतः सतर्क झाली आहे.

नाताळ, शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्या तसेच ३१ डिसेंबरच्या वर्षाअखेर व नववर्ष स्वागतासाठी पाचगणी येथे देश-विदेशातील पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी अधिकारांचा वापर करत हॉटेल, लॉज, खाजगी बंगले यांना नोटिसा बजावत कडक इशारा दिला आहे.

पोलीस नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, २५ डिसेंबर (नाताळ), २७ व २८ डिसेंबर (शनिवार-रविवार) तसेच ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष निगराणी पथके तैनात करण्यात येणार असून खालील सूचनांचे तंतोतंत पालन बंधनकारक राहील.

विनापरवाना साऊंड सिस्टिम/स्पीकर लावण्यास मनाई असून ध्वनीप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी व आवाज मर्यादा पाळाव्यात.

हॉटेल/लॉज व्यवसायामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. रस्त्यावर अडथळा ठरणारे जाहिरातीचे फ्लेक्स लावू नयेत.

हॉटेल व लॉजिंगच्या चालू-बंद वेळेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री किंवा सेवनास सक्त मनाई आहे.

हॉटेल, लॉज किंवा बंगल्यांमध्ये डान्सबार, नृत्यांगणा नाचविणे यासारखी कोणतीही बेकायदेशीर कृत्ये होऊ देऊ नयेत.

अफू, चरस, गांजा, कोकेन यांसारखे कोणतेही अमली पदार्थ बाळगणे किंवा विक्री करण्यास पूर्ण बंदी आहे.

या सूचनांचे उल्लंघन झाल्यास हॉटेल/लॉजिंग मालक व चालक दोघांनाही जबाबदार धरून प्रचलित कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सदर नोटीस ही न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, या कालावधीत पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत अमली पदार्थांची विक्री, डान्सबार किंवा कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी पाचगणी सज्ज होत असताना, पर्यटनाच्या आडून गैरप्रकारांना थारा देणार नाही, असा ठाम संदेश पाचगणी पोलिसांनी दिला असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!