लता दीदींच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ‘कराओके’ गायन स्पर्धा – महाराष्ट्रभरातील गायक-गायिका मंत्रमुग्ध
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा वाई : फर्स्ट मार्च एन्टरप्रायजेस तर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी वाई येथे भव्य राज्यस्तरीय हिंदी-मराठी ‘कराओके’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध शहरांतून आलेल्या तब्बल ७६ गायक-गायिकांनी मंत्रमुग्ध करणारी सादरीकरणे करून रसिकांना अक्षरशः भारावून टाकले. हॉल खचाखच भरलेला होता आणि बाहेर उभे राहूनही अनेकांनी या अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद लुटला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रसाद उलांडे यांनी पटकावला आणि त्यांना डॉ. महेश मेणबुदले यांच्या हस्ते रु. ११,००१ चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक सुधीर जमदाडे यांनी मिळवला आणि त्यांना श्री. कालीदास डोंगरे यांच्या हस्ते रु. ७,००१ मिळाले. तृतीय क्रमांक प्रज्ञा सावंत यांनी मिळवून प्रा. डॉ. विपिन वैराट यांच्या हस्ते रु. ५,००१ पारितोषिक स्वीकारले. श्रेया भांबुरे, आर्या बांदल आणि सुधाकर कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रके तसेच मॅप्रो व धनंजय चना चिक्की यांच्या आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व सहभागी स्पर्धकांसाठीही प्रशस्तीपत्रके, भेटवस्तू, अल्पोपहार व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली.
कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. फॉर्म भरण्यापासून ते रंगीत कार्ड्सद्वारे वेळेचे नियोजन – सर्व टप्प्यांमध्ये काटेकोरपणा जाणवत होता. सकाळी १० वाजता सुरू झालेला हा सुरेल सोहळा संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत रंगला. मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, लोणावळा, बारामती, भोर, लोणंद, पाचगणी, महाबळेश्वर, कराड, वाई आदी ठिकाणांहून आलेल्या गायक-गायिकांनी आपल्या गाण्याने रसिकांना भारावून टाकले. प्रत्येक सादरीकरण मागीलपेक्षा उठावदार ठरत असल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय ठरला.
स्पर्धेचे आयोजन डॉ. शिवाजी शिंदे (संस्थापक अध्यक्ष, ब्लॉसम चिल्ड्रन्स अकॅडमी) व गायक सागर वैराट यांनी केले होते. परीक्षकांनी आवाजाची गुणवत्ता, माईकचा प्रभावी वापर आणि वेळेचे काटेकोर नियोजन या बाबींवर विशेष भर दिला. स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी मान्यवर उपस्थित होते – API सुषील भोसले (लोणंद पोलीस स्टेशन), राजेंद्र पार्टे, राजेश पार्टे, अमित भिलारे, प्रीती कोल्हापूर, संदीप शाह, भद्रेश भाटे, ज्यांनी स्पर्धकांचे मनोबल वाढवले.
या यशस्वी आयोजनासाठी ओमकार शिंदे (ॲडमिनिस्ट्रेटर, ब्लॉसम अकॅडमी) तसेच ब्लॉसम शाळेच्या संपूर्ण शिक्षकवृंदाचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पूर्णिमा शिर्के आणि सारिका महांगडे यांनी केले, तर समारोप डॉ. शिवाजी शिंदे यांच्या मनोगताने झाला.

