भिलार – दानवली रस्त्यावर अल्पवयीनाकडून कोयत्याने हल्ला; सेवानिवृत्त नागरिक गंभीर जखमी
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :महाबळेश्वर तालुक्यातील दानवली परिसरात एका सेवानिवृत्त नागरिकावर अल्पवयीन मुलाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३१ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पाचगणीतील दानवली-भिलार रोडवरील ‘हॉटेल हाय 5’ समोर ही घटना घडली.

याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार भाऊसाहेब गेणु दानवले (वय वर्षे ६० ) यांच्यावर आरोपीने कोणताही पूर्वसंकेत न देता कोयत्याने बेछूट वार केले. या हल्ल्यात त्यांच्या हात, कान, खांदे व पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, आरोपी हा अल्पवयीन असल्याचे समोर आले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पाचगणी सपोनी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एन. एस. माने करत आहेत. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

