सलग दुसऱ्या वर्षी राज्यात अव्वल; ‘माझी वसुंधरा ५.०’मध्ये पाचगणीचा पर्यावरणीय मानाचा तुरा
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा राज्यभर आपली छाप उमटवली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित प्रतिष्ठेच्या माझी वसुंधरा ५.० अभियानात १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपरिषद गटात पाचगणीने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी माझी वसुंधरा ४.०मध्येही पाचगणीने याच गटात अव्वल स्थान मिळवले होते. सलग दोन वर्षे राज्यस्तरावर प्रथम येण्याची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

‘भूमी’ विषयातही राज्यात प्रथम
पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाच्या ‘भूमी’ या घटकातही पाचगणीने राज्यात अव्वल क्रमांक मिळवला. जमिनीचे आरोग्य सुधारणा, हरित पट्टा वाढविणे, मृदसंवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन या क्षेत्रांत केलेल्या सातत्यपूर्ण कामाची ही दखल मानली जात आहे.
कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, जलसंधारण, प्लास्टिक निर्मूलन आणि स्वच्छता मोहिमा यांसारख्या उपक्रमांमध्ये प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीसोबत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यामुळे पाचगणीने ‘स्वच्छ, हरित आणि शाश्वत विकास’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखवले आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात आचार्य देवव्रत, सुनेत्रा पवार, पंकजा मुंडे, राहुल नार्वेकर तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, मुख्याधिकारी पंडित पाटील, नगरसेविका राजश्री सणस, नगरसेवक गणेश कासुर्डे, आणि सिटी को-ऑर्डिनेटर ओंकार ढोले यांनी पुरस्कार स्वीकारला.
नगरपरिषदेच्या या उल्लेखनीय यशामागे लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांचा यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. स्वच्छता दूत, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला.
“हा पुरस्कार केवळ नगरपरिषदेचा नसून प्रत्येक पाचगणीकराचा आहे. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच आम्ही सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम आलो आहोत.”
पंडित पाटील मुख्याधिकारी पाचगणी नगरपरिषद.
“हा मानाचा पुरस्कार म्हणजे केवळ नगरपरिषदेच्या कामाची पावती नसून तो प्रत्येक जागरूक नागरिक, स्वच्छता दूत, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे.
दिलीपभाऊ बगाडे,(नगराध्यक्ष पाचगणी नगरपरिषद)
चौकट : पाचगणीच्या या ऐतिहासिक यशामुळे शहरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले हे ठोस पाऊल राज्यातील इतर नगरपरिषदांसाठी प्रेरणादायी ठरत असून, पाचगणीने ‘हरित पर्यटननगरी’ म्हणून आपली ओळख अधिक भक्कम केली आहे.

