पाचगणी नगरपरिषद नगराध्यक्ष केबिनचे नूतनीकरण; वाढीव सदस्यसंख्येमुळे आसनव्यवस्थेची समस्या दूर
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर नव्याने वाढ झालेल्या प्रभाग रचनेमुळे नगरपरिषदेतील सदस्यसंख्या वाढली असून, त्यानुसार नगराध्यक्ष केबिनमधील आसनव्यवस्था अपुरी पडत होती. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष केबिनचे नूतनीकरण करण्यात आले असून नव्या केबिनचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.

पूर्वी पाचगणी नगरपरिषदेची सदस्यसंख्या १७ असून नगराध्यक्षासह ती १८ होती. तसेच दोन स्वीकृत सदस्य मिळून एकूण संख्या २० इतकी होती. मात्र प्रभाग रचनेत वाढ झाल्याने सदस्यसंख्येत तीन जागांची भर पडून ती आता २३ वर पोहोचली आहे. वाढीव सदस्यसंख्येमुळे बैठकीदरम्यान नगराध्यक्ष केबिनमध्ये जागेची अडचण निर्माण होत होती.
या पार्श्वभूमीवर केबिनचे अंतर्गत नूतनीकरण करून आसनव्यवस्था विस्तारित करण्यात आली. नव्या आराखड्यानुसार बैठक व्यवस्था अधिक सुटसुटीत व प्रशस्त करण्यात आली असून, बैठकींचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे. यामुळे नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी यांना बैठकीदरम्यान होणारी गैरसोय टळणार आहे.
उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, नगरसेवक शेखर कासुर्डे, राजेंद्र पारठे, नारायण बिरामणे, महेश खांडके, अमित कांबळे, आकाश बगाडे, परवीन मेमन, राजश्री सणस, अमृता गोळे, सुप्रिया माने, माधुरी कासुर्डे, विमल भिलारे, स्वाती कांबळे, शिल्पा माने, गणेश कासुर्डे, अनिता चोपडे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नूतनीकरणानंतर नगराध्यक्ष केबिन अधिक कार्यक्षम व आधुनिक स्वरूपात सज्ज झाली असून, वाढत्या सदस्यसंख्येच्या अनुषंगाने प्रशासनिक कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

