रात्रीच्या घरफोड्यांबाबत पाचगणी पोलिसांचा सतर्कतेचा इशारा वाई–जावळी परिसरात सक्रिय टोळ्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचे आवाहन
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : आपल्या लगतच्या वाई व जावळी तालुक्यातील पसरणी, भुईंज आणि मेढा परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास घरफोडी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलिसांनी आपल्या हद्दीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.
पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अद्याप अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसली, तरी शेजारील भागांत घडत असलेल्या घटनांचा विचार करता प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
सपोनि दिलीप पवार यांनी माहिती देताना सांगितले की, वाई आणि मेढा परिसरात रात्री १२ ते पहाटे ३ या वेळेत तीन अनोळखी व्यक्ती घरांमध्ये घुसून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करत असल्याच्या आणि सोने-नाणे तसेच रोख रक्कम चोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही टोळी विशेषतः वस्तीपासून दूर असलेली घरे आणि जिथे वृद्ध नागरिक एकटे राहतात, अशा ठिकाणांना लक्ष्य करत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पाचगणी हद्दीतील नागरिकांनी अधिक दक्षता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रात्रीच्या वेळी कोणतीही अनोळखी व्यक्ती दरवाजा वाजवत असल्यास खात्री झाल्याशिवाय दरवाजा उघडू नये. तसेच घरामध्ये मौल्यवान दागिने किंवा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवणे टाळावे, अशी सूचनाही पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल दिसून आल्यास तात्काळ पाचगणी पोलीस ठाण्याच्या ०२१६८-२४०३३३ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या ९८५०३०११३३ या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर फोन करून त्वरित मदत घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

