भ्रष्टाचाराच्या आरोपाखालीलांनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत” – करहरमध्ये शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर घणाघात
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : “ज्यांच्या भ्रष्ट व्यवहारांचे कच्चे चिट्ठे न्यायालयात आहेत आणि ज्यांच्यावर थेट आरोपपत्र दाखल आहे, त्यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे देऊ नयेत. मी जनतेच्या दारात जाणारा माणूस आहे, पैशाच्या दारात फिरणारा ठेकेदार नाही. माझ्या नादाला लागला तर याद राखा, मी लुंग्या-सुंग्या नाही, छत्रपतींची औलाद आहे,” अशा आक्रमक शब्दांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करहर येथे आयोजित झंझावाती प्रचारसभेत विरोधकांचा समाचार घेतला.

सभेत बोलताना शिवेंद्रराजेंनी नवी मुंबईतील मार्केट कमिटीतील शौचालय घोटाळ्याचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवला. “ज्यांच्या भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे आमदार महेश शिंदे यांच्याकडे उपलब्ध आहेत, त्यांनी माझ्यावर टीका करण्याची पात्रता केव्हाच गमावली आहे,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करता सत्य जनतेसमोर आणले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
माथाडी चळवळीच्या नावाखाली स्वार्थ साधणाऱ्या नेत्यांवरही शिवेंद्रराजेंनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, “आज माथाडी कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. काही नेते केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी या चळवळीचा वापर करत आहेत. कारखानदारांकडून मलिदा खायचा आणि मुंबईत याच गावाकडच्या कष्टकरी माणसाला देशोधडीला लावायचा, असा दुटप्पी उद्योग सुरू आहे. जावलीच्या स्वाभिमानाचा आव आणणाऱ्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे.”
विकासाच्या मुद्द्यावर बोलताना शिवेंद्रराजेंनी आपण केलेल्या कामांचा पाढा वाचला. “निवडणुकीपुरते जावलीत येणे आमच्या रक्तात नाही. आम्ही विकासाचे राजकारण करतो. कुडाळ-करहर रस्त्यासाठी १६८ कोटी रुपये आणि जावलीतील मुख्य रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. विकासकामे हीच आमची ओळख आहे,” असे त्यांनी ठासून सांगितले. तसेच “२०२९ ची स्वप्ने पाहणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की मतदारसंघांची आखणी देवेंद्र फडणवीस ठरवतील. त्यामुळे विरोधकांनी हवेत गप्पा मारणे थांबवावे,” असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली. “या नेत्यांनी अध्यक्षपद मिळाल्यानंतर पक्षाचे वाटोळे केले. आज मुंबईत एक नगरसेवक निवडून आणण्याची ताकदही त्यांच्यात उरलेली नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आणि पाण्यासाठी जेलमध्ये जाणारी माणसे आहोत, तर विरोधक केवळ स्वतःची घरे भरण्यात गुंतले आहेत,” असे ते म्हणाले.
शिवेंद्रराजेंच्या विरोधात उभे राहण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना जावलीची जनता योग्य जागा दाखवेल, असा ठाम विश्वास मानकुमरे यांनी व्यक्त केला. या प्रचारसभेला माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, गोरख महाडिक, रेश्मा पोफळे, हणमंतराव पार्टे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “सत्याची बाजू” आणि “भ्रष्टाचाराला चाप” अशा घोषणांनी करहरचे मैदान अक्षरशः दणाणून गेले होते.

