“माझी लढाई विठ्ठलाशी नाही, बडव्यांशी आहे” – शशिकांत शिंदेंची अप्रत्यक्ष टीका;  करहरमध्ये राष्ट्रवादीची जोरदार सांगता सभा

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : “माझी लढाई विठ्ठलाशी नाही, तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे” अशा शब्दांत शिवेंद्रराजे समर्थकांवर यांचे नाव न घेता  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी अप्रत्यक्ष शाब्दिक घणाघात केला.

करहर (ता. जावळी) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखेरच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, मिलिंद शिंदे, सुरेश पार्टे, गोपाळ बेलोशे, नितीन गोळे, अविनाश दुर्गवाले, समीर गोळे, रवि पार्टे, उमेश दुर्गावळे, म्हसवे गटाचे उमेदवार संदीप पवार, विठ्ठल गोळे, शिल्पा शिंदे, बुवा पिसाळ, अशोक चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, “या निवडणुकीत आम्हाला उमेदवार मिळेल की नाही, अशी चर्चा विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरवली जात होती. त्यांनी पुन्हा तेच जुने चेहरे मैदानात उतरवले आहेत. आम्ही मात्र नव्या चेहऱ्यांना संधी देत आहोत. ही केवळ निवडणूक नसून विचारांची लढाई आहे.”

लोकशक्तीवर आपला ठाम विश्वास असल्याचे सांगत त्यांनी, “आमच्या भीतीने काहींनी ‘आमचं ठरलंय’ अशी अफवा उठवली. पण सत्य हेच आहे की आमचे उमेदवार निवडून येणार आहेत,” असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी विठ्ठल गोळे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती शब्दांत हल्ला चढवला. “पैशासाठी जे वाकले ते मिंदे, तर निष्ठेचं नाव शशिकांत शिंदे,” असे सांगत त्यांनी जावळी तालुक्यात तीन टर्म निवडून आलेल्यांनी नेमका कोणता विकास केला, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान दिले. “आज याच स्टेजवर कमळाची सभा होत आहे. त्यांनी जनतेसमोर उत्तर द्यावे,” असेही ते म्हणाले.

म्हसवे गटाचे उमेदवार संदीप पवार यांनी आपल्या भाषणात विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “विकास हा दुर्बिणीतून पाहण्याची गोष्ट नाही. विरोधक १०० कोटींच्या विकासाचा डांगोरा पिटत आहेत. तर ३० वर्षे धरणासाठी आंदोलन केली.  आजही कॅनॉलचा प्रश्न प्रलंबित आहे,” अशी टीका त्यांनी केली.

या सभेमुळे करहर व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला शेवटच्या टप्प्यात चांगलाच जोर आला असून, निवडणूक लढत अधिक रंगतदार झाल्याचे चित्र दिसत आहे.

प्रचार सभेचे सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले तर प्रस्ताविक समीर गोळे यांनी केले तर शेवटी आभार बुवासाहेब पिसाळ

यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!