म्हसवे गटात ‘प्रस्थापितां’ विरोधात सर्वसामान्यांचा एल्गार; संतोष शिराळेंच्या पाठीशी धरणग्रस्तांची वज्रमूठ

Spread the love

पैसा विरुद्ध निष्ठा : म्हसवे गटात संतोष शिराळेंमुळे राजकीय समीकरणे उलथापालथ

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर  : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. भारतीय जनता पक्षाने या गटात उमेदवारी देताना मूळ ओबीसी निष्ठावंतांना डावलून धनशक्तीला महत्त्व दिल्याचा आरोप होत असतानाच, आता या लढाईला ‘सर्वसामान्यांचा आवाज’ विरुद्ध ‘प्रस्थापित’ असे स्वरूप प्राप्त झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष शिराळे यांनी अन्यायाविरोधात शड्डू ठोकून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याने राजकीय गणिते पूर्णतः बदलली आहेत. विशेष म्हणजे, ज्यांच्या त्यागावर जिल्ह्याची समृद्धी उभी राहिली, त्या धरणग्रस्तांनी आता ‘आपला माणूस’ म्हणून संतोष शिराळे यांच्या पाठीशी आपली वज्रमूठ आवळली आहे.

म्हसवे गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असताना, भाजपने स्थानिक पातळीवरील सक्षम आणि मूळ ओबीसी उमेदवारांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याची भावना जनमानसात आहे. “आरक्षण कोणतेही असो, पदे मात्र प्रस्थापित आणि धनदांडगेच भोगणार” या प्रवृत्तीला आता सामान्य मतदारांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. संविधानाने तळागाळातील समाजाला नेतृत्व मिळावे म्हणून दिलेला अधिकार पैशाच्या जोरावर हिरावून घेतला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यामुळेच, पक्षासाठी प्रामाणिकपणे राबणारा कार्यकर्ता आज उपेक्षित राहिल्याने जनतेने आता शिराळे यांच्या रूपाने आपला हक्काचा प्रतिनिधी निवडण्याचे ठरवले आहे.

धरणग्रस्तांची ताकद आणि ‘आपला माणूस’ हीच शिदोरी या निवडणुकीत संतोष शिराळे यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांना मिळणारा धरणग्रस्तांचा उत्स्फूर्त पाठिंबा. वर्षानुवर्षे आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या धरणग्रस्तांना शिराळे यांच्यामध्ये आपला खंदा पाठीराखा दिसत आहे. “ज्याने आमच्या वेदना समजून घेतल्या, जो सुख-दुखात धावून आला, तोच आमचा माणूस,” अशी भावना व्यक्त करत धरणग्रस्त बांधवांनी शिराळे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. प्रस्थापितांकडे सत्तेचे बळ आणि अफाट संपत्ती असली, तरी शिराळे यांच्याकडे सर्वसामान्यांचे प्रेम आणि धरणग्रस्तांची साथ असल्याने ही लढाई आता ‘पैसा विरुद्ध निष्ठा’ अशी झाली आहे.

 

कोणी कितीही टीका करो किंवा कितीही प्रलोभने दाखवो, यावेळी विजय हा सामान्य जनतेचा आणि विस्थापितांचाच होणार,” असा ठाम विश्वास म्हसवे गटातील मतदार व्यक्त करत आहेत. संतोष शिराळे यांच्या रूपाने एक सुशिक्षित, संयमी आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार मिळाल्याने या गटात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. प्रस्थापितांची घराणेशाही मोडून काढण्यासाठी आणि धरणग्रस्तांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता संपूर्ण गट एकवटला असून, म्हसवे गटात शिराळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!