पर्यटन टिकवायचे असेल तर काळानुसार बदल हवाच – खासदार नितीन (काका) पाटील गुरेघर येथे ३ कोटी ४६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : “ज्याप्रमाणे एखाद्या हॉटेलचे इंटिरियर काही वर्षांनी बदलले नाही तर ग्राहक पाठ फिरवतात, त्याचप्रमाणे पर्यटनस्थळांचेही आहे. बदलत्या काळानुसार बदल अपेक्षित आहेत. जर नवी आकर्षणे निर्माण केली नाहीत, तर पर्यटक दुसरीकडे वळतील. त्यामुळे जुन्या पर्यटन स्थळांचा विकास आवश्यक आहे. तर नवी पर्यटन स्थळे उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन खासदार नितीन काका पाटील यांनी केले.

महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर येथे ३ कोटी ४६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ खासदार नितीन काका पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की यासाठी केंद्रातून मी आणि राज्यातून आमदार मकरंदआबा पाटील भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांचीच समृद्धी होईल,”
या वेळी व्यासपीठावर माजी सभापती संजूबाबा गायकवाड, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण शेठ भिलारे, राजेंद्र शेठ राजपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी राजेंद्र शेठ राजपुरे यांनी तालुक्याच्या विकासाचा आढावा घेताना सांगितले की, आमदार मकरंदआबा पाटील यांच्या माध्यमातून विभागात आतापर्यंत ७३ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून जवळपास प्रत्येक गावाला कोटींच्या घरात निधी मिळाला आहे. बऱ्याच वर्षांनंतर महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून आगामी निवडणुकीत तालुक्यातील सहाच्या सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी आता जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ग्रामीण भागातील जनतेला सक्रिय साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ढेबे गुरुजी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले. यावेळी उद्योजक मयूर व्होरा, नितीन दादा भिलारे, अफजलभाई सुतार, शेखर कासुर्डे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच रमेश चोरमले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

