केट्स पॉईंट येथे १७ वर्षीय युवकाचा खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू; मिसिंग प्रकरणाचा झाला उलगडा..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ केट्स पॉईंट परिसरात खोल दरीत पडून एका १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भगवतसिंह मदनसिंह सोलंकी (वय १७, रा. ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) असे मयत युवकाचे नाव आहे.

याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, भगवतसिंह सोलंकी हा दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता “परीक्षेचे हॉल तिकीट आणायला जातो” असे सांगून घरातून निघून गेला होता. मात्र, तो परत न आल्याने कुटुंबीयांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दि. २४ जानेवारी २०२६ रोजी त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास पाचगणी येथील केट्स पॉईंट परिसरात एका युवकाचा मृतदेह खोल दरीत आढळून आल्याची माहिती पाचगणी पोलीस ठाण्याला मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महाबळेश्वर ट्रेकर्स प्रतापगड ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स मदतीने त्या युवकाला दरीतून वर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
पाचगणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपास केल्यानंतर हा मृतदेह मिसिंग तक्रारीतील भगवतसिंह सोलंकी याचाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पाचगणी पोलिस स्टेशनचे सहा निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.

