पोलिस असल्याची बतावणी करून जेष्ठ नागरिकाची लूट; पाचगणीत धक्कादायक प्रकार
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीमध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या एका जेष्ठ नागरिकाची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस असल्याची बतावणी करत दोन अनोळखी व्यक्तींनी ही चलाखीने लूट केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माधव गजानन बोधे हे नेहमीप्रमाणे सकाळी ८:४५ दरम्यान स्टँड परिसरातील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी जात होते. यावेळी वसंत जाम सेंटरजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. त्यापैकी एकाने स्वतःला पोलिस असल्याचे भासवून परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे सांगितले आणि तपासणीच्या नावाखाली त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यास सांगितले.
विश्वास संपादन करण्यासाठी त्या इसमाने आपल्या साथीदाराचीच बोधे यांच्या समोर बनावट तपासणी करून दाखवली. त्यामुळे बोधे यांचा विश्वास बसला. त्यानंतर अडीच तोळ्याची सोन्याची चैन, पेंडल आणि दोन अंगठ्या रुमालात बांधून घरी गेल्यावरच उघडण्यास सांगण्यात आले.
बोधे यांनीही त्या इसमांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून दागिने रुमालात बांधले आणि पुढे साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले. मात्र मंदिरात रुमाल उघडून पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. रुमालात दागिन्यांऐवजी इतर वस्तू ठेवून अज्ञात चोरट्यांनी त्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर बोधे यांनी घरी जाऊन घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला आणि तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली यावरून तात्काळ घटनास्थळी पाचगणी पोलिस स्टेशनचे सपोनी दिलीप पवार यांनी भेट देऊन घडल्या प्रकाराची माहिती घेऊन तपासाला वेग दिला
चौकट : पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपी जेरबंद होतील मात्र सध्या महाराष्ट्रात बेरोजगारी वाढल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पाचगणी पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी केलं आहे.
या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भामट्यांच्या हालचाली वाढल्याची चर्चा सुरू झाली असून, विशेषतः जेष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

