इनरव्हील क्लब पाचगणीचा उपक्रम; शाळेला क्रीडा साहित्य, अलेक्सा डॉल भेट, २०० विद्यार्थिनींची दंततपासणी
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सामाजिक बांधिलकी जपत इनरव्हील क्लब पाचगणी यांच्या वतीने नगरपालिका शाळा क्रमांक २, पाचगणी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेला क्रीडा साहित्य तसेच विद्यार्थिनींचे सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढविण्यासाठी ‘अलेक्सा डॉल’ हे आधुनिक साधन भेट देण्यात आले.

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आयोजित या कार्यक्रमात आरोग्यालाही प्राधान्य देण्यात आले. शाळेतील सुमारे २०० विद्यार्थिनींची दंततपासणी दंतचिकित्सक डॉ. संपदा वाचल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींना दातांची योग्य निगा कशी राखावी, दैनंदिन स्वच्छतेचे महत्त्व, तसेच दातांच्या आरोग्याशी संबंधित विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘अलेक्सा डॉल’मुळे विद्यार्थिनींना इंग्रजी भाषेचा सराव आणि सामान्य ज्ञान वाढविण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. अंजना पारठे, सेक्रेटरी सौ. चांदनी थदानी, तसेच सौ. मनीषा शिंदे, सौ. सुप्रिया माने, सौ. कल्पना पुरोहित, सौ. योगिता भिलारे, सिमरन खान, सौ. सोनाली साळुंखे, सौ. प्रतिभा कासुर्डे, सौ. प्रियांका भंडारी आदी सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण हिरवे यांनी इनरव्हील क्लबचे मनःपूर्वक आभार मानत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्य विकासाला मोठी चालना मिळत असल्याचे सांगितले.

